सांगली : महापालिका हद्दीतील व्यापाऱ्यांना थकित एलबीटी भरण्यासाठी ३१ जुलैपर्यंतची मुदत आहे. या मुदतीनंतर महापालिकेकडून कारवाईची मोहीम हाती घेतली जाणार असून एलबीटी विभागाने आतापर्यंत नोंदणी व कर न भरलेल्या ३८० व्यापाऱ्यांची यादी तयार केली आहे. आॅगस्टमध्ये या व्यापाऱ्यांवर जप्तीची कारवाई करण्याच्या हालचाली सुरू आहेत. राज्य शासनाने थकित एलबीटीसाठी दंड व व्याजमाफीची घोषणा केली आहे. ३१ मार्च २०१५ पर्यंत थकित असलेल्या व्यापाऱ्यांनी ३१ जुलैपर्यंत संपूर्ण कर भरल्यास त्यांना व्याज व दंड माफ केला जाणार आहे. महापालिकेने अभय योजनेची माहिती देण्यासाठी शुक्रवारी बैठकीचे आयोजन केले आहे. मिरजेत सकाळी साडेअकरा वाजता, तर सांगलीत सायंकाळी साडेचार वाजता बैठक होणार आहे. आतापर्यंत व्यापाऱ्यांचा प्रतिसाद पाहता, मुदतीत एलबीटी वसूल होईल, याची खात्री नाही. त्यासाठी आतापासून कारवाईची तयारी सुरू केली आहे. शासनानेही ३१ जुलैनंतर एलबीटी कायद्यान्वये कारवाई करण्यास महापालिकेला मुभा दिली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात ३८० व्यापाऱ्यांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यांच्यावर जप्तीचा प्रस्तावही ठेवला आहे. आॅगस्टमध्ये या व्यापाऱ्यांवर एलबीटी वसुलीसाठी कारवाई करण्याच्या हालचाली सुरू आहेत. (प्रतिनिधी)
३८० व्यापाऱ्यांवर जप्तीची तयारी सुरु
By admin | Published: July 01, 2015 11:15 PM