कुपवाड : शहरातील शालिनी नगरमधील उत्कर्ष विष्णू लोखंडे (रा. शालिनी नगर हौसिंग सोसायटी, कुपवाड) यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञाताने घरातील ३९ हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली. या घटनेची नोंद कुपवाड पोलीस ठाण्यात झाली आहे. पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, उत्कर्ष लोखंडे हे आपल्या कुटुंबासह बुधवारी घराला कुलूप लावून पुणे येथे गेले होते. या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी बुधवार ते शुक्रवार या कालावधीत लोखंडे यांच्या घराचा पाठीमागील दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. दरवाजा तुटला नसल्याने चोरट्यांनी जिन्यावरील दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला व घरातील तिजोरीत ठेवलेली ३९ हजार रुपयांची रोकड लंपास केली.
दरम्यान, घराचा दरवाजा उघडा असल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात आले. ही माहिती शेजाऱ्यांनी लोखंडे यांना दिली. लोखंडे हे पुण्याहून शनिवारी सायंकाळी घरी आल्यावर त्यांनी घरात पाहिले असता, चोरीचा प्रकार समाेर आला. याबाबत कुपवाड पोलिसात शनिवारी रात्री उशिरा तक्रार दाखल केली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.