सांगली : सार्वजनिक गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत डीजेच्या दणदणाटाने दुधारी (ता. वाळवा) व कवठेएकंद (ता. तासगाव) येथील दोन तरुणांचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. त्यानंतर सलग तिसऱ्या दिवशी मिरजेतील सार्वजनिक मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादाकायक घटना शुक्रवारी उघडकीस आली. राज्य शासनाच्या तोंडी आदेशामुळे निर्बंधमुक्त सार्वजनिक मंडळाचा गणेश उत्सव साजरा करण्यात आला. दरवर्षी ध्वनीक्षेपकाच्या भिंती उभारण्यास व आवाजवर निर्बंध असतात. यावर्षी सर्व मिरवणुका निर्बंधमुक्त झाल्याने सांगली जिल्ह्यातील विविध तालुक्यांसह शहर व मिरजेतील गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत डीजेचा दणदणाट पाहायला मिळाला. गणेशभक्त व मिरवणुका पाहण्यासाठी बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांच्या कानठळ्या बसविणाऱ्या आवाजाने ७० ते ८० डेसिबलची मर्यादाही ओलांडली.मिरज शहरातील सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर गुरुवारी रात्री डाॅल्बीचा दणदणाट होता. या मिरवणुका पाहण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीचा संशयास्पद मृत्यूची घटना शुक्रवारी उघडकीस आली. सुमारे ५० वर्षे वयाच्या या व्यक्तीच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, त्याचा डीजेच्या दणदणाटामुळे हृद्यविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा अंदाज स्थानिकांनी व्यक्त केला आहे.
मृत्यूचे कारण अस्पष्ट ?मिरजेतील गुरुवार पेठेत डॉल्बीच्या दणदणाटामध्येच मिरवणुका सुरू झाल्या. याठिकाणी अज्ञात व्यक्ती रस्त्याच्या बाजूला पडल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्याचा जागीच मृत्यू झालेला होता. याबाबत पोलिस अधीक्षक बसवराज तेली यांनी संबंधित व्यक्तीचा मृत्यू डाॅल्बीमुळे झाला की अन्य कारणांमुळे झाला, हे शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल, असे सांगितले.