शिरटे : ऊस वजनात किमान १० टक्के काटामारी साखर कारखान्याकडून सुरू आहे. यातून खासगी व सहकारी साखर कारखान्यांनी किमान ४ हजार ५८१ कोटी रुपयांची लूट केली असल्याची घणाघाती टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी केली. ऊसदर व एकरकमी एफआरपीसाठी तुम्ही फक्त लढायला तयार व्हा, डोकी फुटायची वेळ आली तर पहिली आमची फुटतील, अशी आक्रमक भूमिका त्यांनी यावेळी मांडली.
जयसिंगपूर येथे १५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ऊस दर मेळाव्याच्या जनजागृतीसाठी येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथून ‘जागर एफआरपीचा संघर्ष ऊसदराचा’ यात्रेची सुरुवात करण्यात आली. यावेळी शेट्टी बोलत होते. सुभाष पाटील अध्यक्षस्थानी होते. यावेळी महेश खराडे, देवानंद पाटील, संदीप राजोबा, पोपट मोरे, अप्पासाहेब पाटील, तानाजी साठे, ॲड. एस. यू. संदे, भागवत जाधव, राम पाटील, प्रकाश देसाई, संजय बेले, जयवंत पाटील, शहाजी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांच्या जिवावर जिल्हा बँकेतील बांडगुळे पोसण्यासाठी साखर कारखादारीचा उपयोग राजकारण्यांनी केला. गेल्या चार वर्षांपासून ऊसदर आहे तोच आहे. एफआरपी वाढली; पण ती तोडणी वाहतुकीतच गेली आहे. काटा मारणाऱ्यांचा काटा काढायचा असेल तर राज्यकर्त्यांवर दबाव आणला पाहिजे.
क्रांतिसिंह नाना पाटील यांचे नातू सुभाष पाटील म्हणाले, देशातील पहिला दुधाचा संप क्रांतिसिंह नाना पाटील यांनी केला होता. शेतमालाला किफायतशीर दर मिळावा यासाठी ते धडपडत होते. सध्याच्या राज्यकर्त्यांची भूमिका नेहमीच शेतकरीविरोधी राहिली आहे. शेतकऱ्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी संघटित व्हावे.
महेश खराडे म्हणाले, ऊसदराची लढाई ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई आहे. यावर्षी एकरकमी एफआरपी मिळाल्याशिवाय साखर कारखान्याचे धुराडे पेटू द्यायचे नाही.
आकाश साळुंखे यांनी स्वागत केले. रविकिरण माने यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी राम पाटील, ॲड. एस. यू. संदे, पोपटसण्णा मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी रवींद्र कुलकर्णी, मानसिंग पाटील आदी उपस्थित हाेते.
वाळवा तालुक्यातच पाणी मुरतंय...
कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी मिळते; परंतु सांगली जिल्ह्यात शेतकऱ्यांना ऊसदर असो की, एकरकमी एफआरपी असो, ती मिळू नये यासाठी वाळवे तालुक्यातच पाणी मुरतंय, अशी टीका सुभाष पाटील यांनी आमदार जयंत पाटील यांचे नाव न घेता केली.