विकास शहाशिराळा : शिराळा तालुक्याच्या उत्तर भागात वादळी वाऱ्यासह वळवाच्या पावसाने तासभर हजेरी लावली. यामध्ये वादळी वाऱ्याने २३ विद्युत खांब मोडून पडले असून १८ विद्युत खांब वाकले असून, अनेक ठिकाणी झाडे विद्युत तारांवर पडल्याने ताराही तुटल्याने महावितरण कंपनीचे चार लाखांचे नुकसान झाले आहे. ज्या ठिकाणी विद्युत खांब वाकले, न मोडलेल्या ठिकाणी त्यांच्या दुरुस्तीचे काम ‘महावितरण’चे कर्मचारी व चार ठेकेदारांच्या माध्यमातून युद्धपातळीवर काम सुरू आहे.उत्तर भागात वादळी वाऱ्यासह पावसाचे आगमन झाले. पावसापेक्षा वादळी वारा अधिक असल्याने आंबेवाडी येथील बजरंग संभाजी चव्हाण यांच्या घरावरील पूर्ण पात्रा लोखंडी अँगलसह अलगद उडून दुसरीकडे पडला. गिरजवडे येथील शरद पाटील यांच्या शेडचा पत्रा उडून गेला आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. टाकवे येथील शंकर जाधव यांच्या आंब्याच्या बागेतील आंबे वादळी वाऱ्यामुळे पडल्याने नुकसान झाले आहे.शिरशी, आंबेवाडी, पं.त. शिराळा, बांबवडे, निगडी, पाडळेवाडी, अंत्री बुद्रुक, करमाळे, खेड, कापरी ठिकाणी विद्युत खांब मोडून पाडले असून अनेक ठिकाणी वाकले आहेत. काही ठिकाणी झाडे पडल्याने विद्युत तारा तुटल्याने व खांब वाकल्याने व पडल्याने जमिनीवर लोंबकळू लागल्या आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला होता.महावितरणने तातडीने ज्या ठिकाणी तत्काळ विद्युत पुरवठा सुरू करता येईल, अशा ठिकाणी सुरू केला आहे. ज्या ठिकाणी विद्युत खांब मोडले व वाकले आहेत, अशा ठिकाणी त्यांची दुरुस्ती व ते बदलण्याचे काम युद्धपातळीवर चार ठेकेदार व महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणचा विद्युत पुरवठा पूर्ववत सुरू झाला आहे.
शिराळा तालुक्यात महावितरणचे नुकसान
- लघुदाब वाहिनी - १७ विद्युत खांब पडले, तर १२ वाकले
- उच्चदाब वाहिनी - ६ विद्युत खांब पाडले तर ६ वाकले
- साडेतीनशे कुटुंबांचा, तर ४५ शेतीपंपांचा विद्युत पुरवठा खंडित.
वादळी वाऱ्यामुळे विद्युत खांब मोडणे, वाकणे व तारा तुटल्याने सुमारे चार लाखांचे नुकसान झाले आहे. ज्या ठिकाणी अशा घटना घडल्या आहेत, त्या ठिकाणचा विद्युत पुरवठा पूर्ववत सुरू करण्यासाठी आमच्या कर्मचाऱ्यांसमवेत आणखी चार ठेकेदार यांच्या माध्यमातून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा सुरू झाला आहे. उर्वरित तातडीने सुरू होईल. - एल. बी. खटावकर, उपकार्यकारी अभियंता, शिराळा