सांगली : श्रवणबेळगोळ (कर्नाटक) येथील विंध्यगिरी पर्वतावरील भगवान बाहुबलींच्या १०३५ वर्षे जुन्या मूर्तीवर ८८ व्या मस्तकाभिषेकाची तयारी जोरात सुरू आहे. जैन श्रावक-श्राविकांच्या स्वागतासाठी श्रवणबेळगोळ सज्ज झाले आहे. हा सोहळा भव्यदिव्य ठरावा, यासाठी देशभरात ४० विविध समित्याही स्थापन करण्यात आल्या आहेत. प्रत्येक समितीवर विशिष्ट जबाबदारीही सोपविण्यात आली आहे.
दर बारा वर्षानी होणाºया या सोहळ्याला यंदा ७ फेब्रुवारीपासून सुरूवात होत आहे. हा महोत्सव २५ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. भगवान बाहुबली यांच्या १०३५ वर्षे जुन्या या मूर्तीला दूध, दही, तूप, केशर अशा विविध पवित्र वस्तूंनी अभिषेक केला जाणार आहे.
या सोहळ्यासाठी कर्नाटक सरकारने १८५ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. त्यातून श्रवणबेळगोळ येथे पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. हा सोहळा भव्यदिव्य व्हावा, यासाठी ४० समित्याही तयार केल्या आहेत. या समितीवर विशिष्ट जबाबदारी सोपविण्यात आली आहे. जैन मुनी, आर्यिक यांच्या निवास, आहारापासून ते सोहळ्यासाठी येणाºया भाविकांच्या निवासापर्यंतची व्यवस्था केली आहे. त्यागीनगर, कलशनगर, भोजनगृहे, अभिषेकाची व्यवस्था, भगवान आदिनाथ पंचकल्याण महोत्सव अशा विविध कार्यासाठी वेगवेगळ्या समित्या कार्यरत झाल्या आहेत.
श्रवणबेळगोळ येथे उपचारासाठी एक सुपर मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उघडले आहे. विंध्यगिरी पर्वतावरील मंदिरात जाण्यासाठी ६१८ पायºया आहेत. पर्वत चढण्यास अडचण असलेल्यांसाठी पालख्यांची व्यवस्था केली आहे. विंध्यगिरी पर्वतावर पोहोचण्यासाठी ३ लिफ्ट बनवल्या आहेत. दोन भाविकांसाठी, तर एक महाभिषेक साहित्य पोहोचवण्यासाठी आहे.प्लॅटफॉर्मसाठी जर्मनीहून साहित्यविंध्यगिरी पर्वतावरील भगवान बाहुबली यांच्या मुख्य मूर्तीजवळ मंच तयार करण्यात आला आहे. त्यासाठी जर्मन तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.
मंचासाठी ४५० टन साहित्य जर्मनीहून मागविण्यात आले आहे. त्यावर बारा कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या मंचावर एका वेळी ६ हजार लोक पूजेत सहभागी होऊ शकतील, अशी व्यवस्था केली आहे.