सांगली : कर्जमाफी योजनेअंतर्गत सांगली जिल्ह्यात आजअखेर १५ याद्या प्रसिद्ध झाल्या असून, जिल्ह्यातील १ लाख १९ हजार शेतकऱ्यांना २७४ कोटी रुपयांचा लाभ मिळाला आहे. अजूनही जिल्ह्यातील ४0 हजारावर शेतकरी कर्जमाफी योजनेपासून वंचित राहिले आहेत. यात जिल्हा बँकेचे २५ हजार कर्जदार शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत.राज्य सरकारने दोन वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजना जाहीर केली होती. योजनेअंतर्गत पात्र असतानाही लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यांच्या कर्जाचा आकडा ३५ कोटी रुपयांच्या घरात आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी, कर्जमाफीपासून वंचित असणाऱ्यांना लवकरच न्याय दिला जाईल, अशी घोषणा केल्याने आता या शेतकऱ्यांचे लक्ष शासनाच्या निर्णयाकडे लागले आहे.शेतकऱ्यांचे दीड लाखापर्यंतचे थकीत कर्ज पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्ह्यातील दीड लाखापर्यंत कर्ज असणाऱ्या २९ हजार ९ शेतकऱ्यांचे ११८ कोटी ११ लाख रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले.
दीड लाखापेक्षा अधिक रक्कम थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांना एकरकमी परतफेड योजना लागू करण्यात आली. त्यामध्ये जिल्ह्यातील ३ हजार ४५५ शेतकऱ्यांना ३२ कोटी ३३ लाख रूपयांचा लाभ मिळाला. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना २५ रुपये प्रोत्साहन अनुदान देण्यात आले. यामध्ये जिल्ह्यातील ८७ हजार ३0१ शेतकऱ्यांना १३४ कोटी ३८ लाख रुपयांचा लाभ मिळाला.आजअखेर लाभार्थी शेतकऱ्यांच्या पंधरा याद्या प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. तरीही या १५ याद्यांमधून जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही. जिल्ह्यातील चाळीस हजार शेतकरी अद्याप वंचित आहेत.