निवास पवार ।शिरटे : सुमारे चार हजार वृक्षांची लावण, वृक्षसंगोपनासाठी स्वखर्चाने किल्लेमच्छिंद्रगड डोंगरमाथ्यापर्यंत पाईपलाईन, डोंगरावरच पाण्याच्या टाकीचे बांधकाम, यातून २५०० रोपांना ठिबकने पाणी. ही धडपड आहे किल्लेमच्छिंद्रगडातील एक अवलियाची. शिवकुमार पाटील हे त्याचे नाव.
किल्लेमच्छिंद्रगडावर (ता. वाळवा) पाटील यांनी गेल्या पाच वर्षात गडवड, पिंपळ, जांभूळ, साग, पायरन, चिंच, आवळा, सीताफळ आदी देशी वाणाच्या सुमारे चार हजार रोपांची लावण केली आहे. वृक्ष संगोपनासाठी आमदार जयंत पाटील यांनी २०० फुटापर्यंत कूपनलिका खुदाई करुन दिली होती. परंतु हे पाणी सर्व झाडांना पुरत नव्हते. नंतर शिवकुमार पाटील यांनी स्वखर्चाने वाढीव कूपनलिका खुदाई केली. तेथून वरपर्यंत पाईपलाईन केली. डोंगरमध्यावर टाकी बांधून २५०० रोपांना ठिबक केले आहे. या उपक्रमाची वाळवा पंचायत समितीचे सभापती सचिन हुलवान यांनी पाहणी केली. त्यांच्यासमवेत संतोष इंगवले, प्रकाश साळुंखे, सुहास पाटील, सचिन साळुंखे, हणमंतराव मोरे, सिकंदर जमादार, राहुल पाटील उपस्थित होते.
किल्लेमच्छिंद्रगडावर पूर्वी सीताफळाची खूप झाडे होती. परंतु वृक्षतोडीमुळे ती नष्ट झाली. सीताफळाचे गतवैभव पुन्हा प्राप्त व्हावे, यासाठी पुढील वर्षापासून याठिकाणी सीताफळाची लागवड करणार आहे. बीजांपासून रोपे तयार करण्याचे काम चालू केले आहे.- शिवकुमार पाटील, किल्लेमच्छिंद्रगड