शिरटे : सुमारे ४ हजार वृक्षरोपांची लावण... वृक्षसंगोपनासाठी स्वखर्चाने किल्लेमच्छिंद्रगड डोंगरमाथ्यापर्यंत पाईपलाईन.... झाडांना जगवण्यासाठी डोंगरावरच आरसीसी पाण्याच्या टाकीचे बांधकाम... यातून २५०० रोपांना ठिबकणे पाणी... झाडे लावण्याबरोबरच ती जगवण्यासाठी सुरु असलेली धडपड... या झाडांसाठी किल्लेमच्छिंद्रगडातील एक अवलिया झटतोय... त्याच्या या प्रयत्नांना सलाम....!किल्लेमच्छिंद्रगडावर (ता. वाळवा) शिवकुमार पाटील यांनी गेल्या पाच वर्षात गडवड, पिंपळ, जांभुळ, साग, पायरन, चिंच, आवळा, सितीफळ आदी देशीवानाच्या सुमारे ४ हजार वृक्षरोपांची लावण केली आहे. वृक्षसंगोपनासाठी आमदार जयंत पाटील यांनी २०० फुटापर्यंतचे बोअरवेल खुदाई करुन दिली होती. परंतु हे पाणी सर्व झाडांना पुरत नव्हते. पाण्याची कमतरता भासल्यानंतर पाटील यांनी स्वखर्चाने वाढीव बोअरवेल खुदाई केली. तेथून वरती पाईपलाईन केले आहे. वृक्षरोपांना पाणी देण्यासाठी डोंगरमध्यावर आरसीसी पाण्याची टाकी बांधुन २५०० रोपांना ठिबक केले आहे.
किल्लेमच्छिंद्रगड येथील पर्यटनस्थळी सुरु असलेल्या या उपक्रमाची वाळवा पंचायत समितीचे सभापती सचिन हुलवान यांनी पहाणी केली. हुलवान म्हणाले की, पर्यावरणाचा ढासळत चाललेला समतोल साधला गेला नाही तर पृथ्वीचे रुप विराण होवुन सजिवाचे अस्तित्व धोक्यात येईल. सजिवाचे जगणे सुस' व्हावे यासाठी वृक्ष लागवड आणि संगोपनाचे काम दिर्घकाळ होणे गरजेचे आहे. शिवकुमार पाटील यांची वृक्षसंवर्धनाची धडपड कौतुकास पात्र आहे.शिवकुमार पाटील म्हणाले, जास्तीत जास्त वृक्षलागवड व्हावी यासाठी शासनाकडे प्रस्ताव देवुनही संबंधित यंत्रणेकडुन त्याची दखल घेतली जात नाही.सभापती सचिन हुलवान यांच्या समवेत संतोष इंगवले, प्रकाश साळुंखे, सुहास पाटील, सचिन साळुंखे, हणमंतराव मोरे, सिंकदर जमादार, राहुल पाटील उपस्थित होते.
किल्लेमच्छिंद्रगडावर पूर्वी सिताफळाची झाडे मोठ्या प्रमाणात होती. परंतु काळाच्या ओघात वृक्षतोडीमुळे ती नष्ट झाली. सिताफळाचे गतवैभव पुन्हा प्राप्त व्हावे यासाठी पुढील वर्षापासून सिताफळाची मोठ्या प्रमाणात लावण करणार आहे. सिताफळाच्या बिजापासून रोपे तयार करणेचे काम चालू केले आहे.शिवकुमार पाटील, किल्लेमच्छिंद्रगड.