सांगली : नेमीनाथनगर परिसरातील एका कोरोनाबाधित रुग्णांकडून खासगी रुग्णालयाने उपचारापोटी एक लाख ३२ हजार रुपयांचे बिल आकारले होते. संबंधित रुग्णाने जादा बिलाबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले.
अखेर रुग्णांला ४१ हजार रुपये जादा आकारण्यात आल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. त्यानंतर तातडीने संबंधित रुग्णाला पैसे परत करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार संबंधित रुग्णालयाने जादा बिलाचे पैसे रुग्णाच्या खात्यावर वर्ग केले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या दणक्याने कोरोनाबाधित रुग्णाला दिलासा मिळाला.नेमीनाथनगर येथील एका व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होत होता. ते मिरज रस्त्यावरील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. त्यांच्या कोरोनाचा पहिला अहवाल निगेटिव्ह आला. तरीही त्यांना घरी सोडले नाही. पुन्हा दोनदा चाचणी केल्यानंतर त्यांना कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगण्यात आले. या काळात संबंधित रुग्णाला कसलाही त्रास जाणवत नव्हता. त्यांना व्हेटिलेंटर लावले नव्हते की विशेष उपचार दिले गेले नाहीत.
पॉझिटिव्ह अहवाल आल्यानंतर चार दिवसांत त्यांना घरी सोडण्यात आले. या काळात उपचाराचे एक लाख ४५ हजार रुपयांचे बिल रुग्णालयाने केले. संबंधित रुग्णाने महात्मा फुले योजनेचा लाभ देण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पुर्तताही केली. तरीही त्यांच्याकडून संपूर्ण रक्कम भरून डिस्चार्ज देण्यात आला. याबाबत संबंधित रुग्णाने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.शिवसेनेचे नेते शेखर माने यांनीही जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून संबंधित प्रकरणाच्या चौकशी मागणी केली. जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी या पत्राची दखल घेत वित्त व लेखा विभागाच्या अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले.
त्यानुसार लेखा विभागाच्या अधिकाऱ्यांनी रुग्णाच्या बिलाची पडताळणी केली. यात रुग्णांकडून ४१ हजार रुपये जादा घेतल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित रुग्णालयात तातडीने पैसे परत करण्याची नोटीस बजाविली. रुग्णालयाने जादाची ४१ हजार रुपये रुग्णाला परत केले आहेत.