सांगली : जिल्ह्यात सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे ४५ हजार ८६८ शेतकऱ्यांचे २१ हजार ८८७.३५ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना भरपाईसाठी ४२ कोटी २५ लाख ८५ हजार रुपयांचा निधी लागणार आहे. यासंबंधीचा अहवाल जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे पाठविला आहे.जिल्ह्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली होती. वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस झाल्यामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. प्रशासनाने दि. २४ नोव्हेंबर २०२२ रोजी अतिवृष्टी, अतिपावसामुळे नुकसान झालेल्या पिकांच्या पंचनाम्याचा अहवाल अंतिम केला आहे. यामध्ये शिराळा तालुक्यातील एकाही शेतकऱ्याचे नुकसान झाले नाही. उर्वरित नऊ तालुक्यांतील ४५ हजार ८६८ शेतकऱ्यांच्या २१ हजार ८८७.३५ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे.या नुकसान भरपाईसाठी जिल्हा प्रशासनाने ४२ कोटी २५ लाख १५ हजार रुपये निधीची मागणी शासनाकडे केली आहे. यामध्ये जिरायत पिकाखालील २८ हजार ४९४ शेतकऱ्यांचे १४ हजार २७१.६२ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले असून त्यासाठी १९ कोटी ४२ लाख ७८ हजार रुपये लागणार आहेत. तसेच बागायत पिकाखालील बाधित क्षेत्र पाच हजार ७४.४९ हेक्टर क्षेत्रातील ११ हजार ९४६ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे.या शेतकऱ्यांच्या भरपाईसाठी १३ कोटी ७१ लाख ११२ रुपये निधीची गरज आहे. ५ हजार ४२८ शेतकऱ्यांचे २ हजार ५३३.२४ हेक्टर क्षेत्रातील द्राक्ष, डाळींब, केळी, पेरु, नारळ, पपई या फळ पिकांचे नुकसान झाले आहे. यासाठी ९ कोटी ११ लाख ९६६ रुपये निधी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे मागितला आहे.
खरीप पिकावर रोटाव्हेटर फिरवला त्यांचे काय ?खरीप हंगामातील सोयाबीन, मका, ज्वारी, तूर, भुईमूग, उडीद, मूग, सूर्यफूल, बाजरी, हरभरा आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे करण्याची वाट पाहून अनेक शेतकऱ्यांनी रोटाव्हेटर फिरवून रब्बीची पेरणी केली. या पिकाचे पंचनामे झाले नाहीत. या शेतकऱ्यांना शासनाकडून न्याय देण्याची गरज आहे. परंतु, प्रशासनाने पिकच नसल्यामुळे आम्ही पंचनामे करणार नाही, असा पवित्रा घेतला आहे.
खरीप पिकांचे तालुकानिहाय क्षेत्र
तालुका | शेतकरी संख्या | क्षेत्र हेक्टर | अपेक्षित निधी (लाखात) |
मिरज | २१३७ | १४१८.३१ | ३६२.३३० |
वाळवा | ४२२५ | १३२४.७१ | ३६१.०३७ |
पलूस | १५८४ | ७५३.३७ | २०५.२२० |
खानापूर | ४५२७ | १५६६.९० | २४१.५६९ |
कडेगाव | २८४ | ७५.९३ | १५.२३९ |
तासगाव | १७९६९ | १०४८१.२७ | १४६३.५६६ |
आटपाडी | ९८ | ४२.६० | १५.३३६ |
जत | ४०९९ | १७१७.६५ | ३९१.२८८ |
क.महांकाळ | १०९४५ | ४५०३.५३ | ११६९.५७१ |
एकूण | ४५८६८ | २१८८७.३५ | ४२२५.१५७ |