मिरज : दुर्मिळ म्हांडूळ जातीच्या सापाची तस्करी करणाºया दोघांना मिरज तालुक्यातील खंडेराजुरी येथे पोलिस उपअधीक्षक धीरज पाटील यांच्या पथकाने शुक्रवारी अटक केली. त्यांच्याकडून आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे ४५ लाख रुपये किंमत असलेला म्हांडूळ जातीचा साप हस्तगत करण्यात आला. हुसेन कोंडीबा तांबोळी (वय ६४, रा. माधवनगर, ता. मिरज) व लतीफ हुसेन जमादार (६५, रा. सहयोग कॉलनी, सांगली) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.तांबोळी व जमादार हे दोघे दुर्मिळ जातीच्या म्हांडूळ या सापाची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना सर्पमित्रांकडून मिळाली होती. पोलिसांनी दोघांकडे बोगस ग्राहक पाठवून, पंचेचाळीस लाखात म्हांडूळ सापाचा सौदा ठरविला. म्हांडूळ साप घेऊन हे दोघेजण गुरुवारी रात्री खंडेराजुरी येथे विक्रीसाठी आल्यानंतर, हवालदार लक्ष्मण जाधव, सचिन धोतरे, संतोष पुजारी, मुख्तार चमनशेख यांच्या पथकाने या दोघांना तीन किलो वजनाच्या म्हांडूळ सापासह ताब्यात घेतले. सापाच्या तस्करीप्रकरणी तांबोळी व जमादार यांच्याविरुद्ध मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पोलिस कर्मचारी संतोष पुजारी यांनी फिर्याद दिली आहे. तांबोळी व जमादार यांनी, खंडेराजुरी येथील विक्रम कांबळे नामक व्यक्तीकडून म्हांडूळ घेऊन त्याची विक्री करत असल्याची कबुली दिली आहे. सापांची तस्करी करणाºया टोळीच्या सूत्रधाराचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. हा म्हांडूळ साप वन विभागाच्या ताब्यात देण्यात आला. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर, त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली.काळ्या जादूसाठी...पैशाचा पाऊस पाडणारी काळी जादू, या अंधश्रध्देच्या प्रकारासाठी म्हांडूळ या सापाला मागणी आहे. काळी जादू करण्यासाठी लाखो रुपये मोजून म्हांडूळ सापाची विक्री करण्यात येते. म्हांडूळ पकडून त्याची विक्री करणाºया अनेक टोळ्या सक्रिय असून, काळ्या जादूच्या बहाण्याने फसवणुकीचे प्रकार सुरू आहेत.