सांगली : मान्सून पावसाने हुलकावणी दिल्यामुळे खरीप पीक वाळू लागली आहेत. बाजरी, मका, कडधान्यासह अन्य पिकांच्या उत्पन्नात सरासरी ४५ टक्के घट येणार आहे. बागायती पिकांच्या उत्पन्नात १० ते १५ टक्के घट येण्याची शक्यता आहे. कृषी विभागाने याबाबतचा प्राथमिक अहवाल शासनाकडे पाठविला आहे.ढगाळ व कोरडे वातावरण, कमी पाऊस अशी जिल्ह्यात हवामानाची स्थिती आहे. दि. १ ते २२ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात केवळ २८.८ मिलीमीटर पाऊस झाला आहे. आठवड्यात पावसाचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. पावसाने पूर्ण उघडीप दिली आहे. दुपारच्या कडक उन्हामुळे कोरडवाहू क्षेत्रातील पिके सुकू लागली आहेत. पिकांची वाढ पूर्णत: खुंटली आहे. वाढीच्या अवस्थेत असलेल्या पिकांना पावसाची गरज आहे.जिल्ह्यात खरीप हंगामाचे दोन लाख ५५ हजार ९८४ हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी एक लाख ५३ हजार ६६.९ हेक्टरवर पेरणी झाली होती. ५८.८० टक्के क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. उर्वरित एक लाखावर हेक्टरवर पेरणीच झाली नाही. पेरणी क्षेत्रातील पिकेही पाऊस नसल्यामुळे वाळू लागली आहेत. बागायती क्षेत्रातील पिकाच्या उत्पन्नातही घट येणार आहे.मिरज, जत, आटपाडी, कडेगाव, तासगाव, कवठेमहांकाळ, खानापूर या तालुक्यांमध्ये पेरणी क्षेत्रात ३० ते ३५ टक्के घट झाली आहे; तसेच पावसातील खंडामुळे अंदाजे जिरायत क्षेत्रातील पिकांच्या उत्पन्नात ३० ते ३५ टक्के, तर बागायत क्षेत्रात १० ते १५ टक्के घट येणार आहे.सोयाबीन, भुईमूग पिकांना पाणी मिळत नसल्यामुळे वाढ खुंटली असून उत्पन्नात ३५ ते ४० घट येणार आहे. जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, खानापूर, तासगाव, कडेगाव तालुक्यांसह मिरज पूर्व भागातील कडधान्याची पिके पाऊस नसल्यामुळे वाया गेली आहेत.
असे घटणार उत्पन्नपीक - उत्पन्नात घटज्वारी - २० ते ३५ टक्केमका - ३५ ते ४५ टक्केकडधान्य - ५० ते ६५ टक्केसोयाबीन - ३५ ते ४० टक्केभुईमूग - ३० ते ४० टक्के
फळ पिकांनाही फटकापुरेसा पाऊस झाला नाही तर द्राक्षांची छाटणी हंगाम लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. भुरी रोगाचा अल्प प्रमाणात प्रादुर्भाव आहे. डाळिंब पिकालाही पाऊस न पडल्याचा फटका बसला आहे. डाळिंब बागांना मर रोगाचा प्रदुर्भाव दिसून येत आहे, असे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.