सचिन लाड ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन नये, यासाठी पोलीस यंत्रणेने कारवाईच्या माध्यमातून जोरदार तयारी सुरू ठेवली आहे. रेकॉर्डवरील ४५० गुन्हेगारांची यादी बनवून त्यांना कारवाईच्या ‘हिटलिस्ट’वर ठेवले आहे. त्यांच्याविरुध्द तडीपार व स्थानबध्दता करण्याची व्यूहरचना आखण्यात आली आहे. अवैध व्यावसायिकांनाही ‘टार्गेट’ केले आहे.पालिकेच्या निवडणुकीसाठी सांगली, मिरज व कुपवाड या तीनही शहरात १ आॅगस्टला मतदान होत आहे. तीनही शहरांचे मोठ्या प्रमाणात विस्तारीकरण झाले आहे. लोकसंंख्या वाढली असली तरी त्या तुलनेत पोलिसांची संख्या अपुरी आहे. अनेक प्रभाग संवेदनशील आहेत. उमेदवार व त्यांच्या समर्थकांमध्ये किरकोळ कारणांवरून वादाचे प्रकार घडू शकतात. यातून कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा यांनी कारवाईचे चांगल्याप्रकारे नियोजन केले आहे. त्याची सुरुवात आचारसंहिता लागू झाल्यापासून केली आहे. पहिल्या टप्प्यात संपूर्ण जिल्ह्यात ‘आॅपरेशन आॅलआऊट’ मोहीम राबवून विविध प्रकारच्या अडीचशेहून अधिक कारवाया केल्या. अवैध व्यावसायिकांनी बस्तान बसवू नये, यासाठी त्यांना ‘टार्गेट’ केले आहे.गुन्हेगारांची यादी बनविण्याचे आदेशगुन्हेगारीत सक्रिय असलेल्या व नसलेल्या गुन्हेगारांची यादी बनविण्याचे आदेश शर्मा यांनी दिले आहेत. त्यानुसार सांगली शहर, संजयनगर, विश्रामबाग, कुपवाड, मिरज शहर व महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यातील पोलीस कामाला लागले आहेत. तडीपार केलेल्या गुन्हेगारांनी पुन्हा सांगलीत येऊ नये, यासाठी त्यांच्या घरावर ‘वॉच’ ठेवण्यात आला आहे. गेल्या पंधरा दिवसांत सहा तडीपार गुन्हेगारांना पकडून पुन्हा जिल्ह्याबाहेर सोडले आहे. ग्रामीण भागातील गुन्हेगार उमेदवारांच्या समर्थनार्थ शहरात येऊ नयेत, यासाठी त्यांच्याविरुध्दही कारवाईचे नियोजन केले आहे.हॉटेल, ढाब्यांवर नजरनिवडणुकीची रणधुमाळी सुरूझाल्याने रात्रीच्या जेवणावेळी सुरू झाल्या आहेत. शहर व परिसरातील हॉटेल, दारूची दुकाने व ढाब्यावर गर्दी वाढली आहे. यातून कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी हॉटेल, ढाबे व दारू दुकानमालकांना रात्री अकरानंतर दुकाने बंद करण्याची सूचना केली आहे. पान दुकाने तसेच खाद्यपदार्थ विक्रेत्यांनाही साडेदहानंतर व्यवसाय बंद झाला पाहिजे, असा आदेश दिला आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अकरा व्यावसायिकांविरुद्ध आतापर्यंत कारवाई केली आहे.सीसीटीव्हीची मदतनिवडणुकीच्यानिमित्ताने नोटा व अवैध शस्त्रांची तस्करी होऊ नये, यासाठी दररोज रात्री नाकाबंदी केली जात आहे. रात्री अकरानंतर संशयित वाहने थांबवून त्यांची तपासणी केली जात आहे. वाहनाचा क्रमांक, चालकाच्या नावाची नोंद करून घेतली जात आहे. यासाठी तीनही शहरात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेºयांची मदत घेतली जात आहे.
पोलीस ‘हिटलिस्ट’वर जिल्ह्यातील ४५० गुन्हेगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2018 12:00 AM