सांगली : जिल्ह्यातील पाच नगरपालिका आणि चार नगरपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया चालू झाली आहे. पाच नगरपालिका आणि चार नगरपंचायतींमध्ये एकूण १७९ जागांसाठी एक हजार ४०८ उमेदवारी अर्ज दाखल होते. बुधवारी अर्ज छाननीमध्ये ४५० अर्ज अवैध ठरले असून, ९५८ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. शिराळा नगरपंचायतीसाठी एकही अर्ज आला नव्हता. काही दिग्गज उमेदवारांचे अर्ज अवैध ठरल्यामुळे त्यांना निवडणुकीपूर्वीच मैदानातून बाहेर रहावे लागणार आहे. उर्वरित वैध उमेदवारांपैकी कितीजण मैदानात राहणार, हे दि. ११ नोव्हेंबर रोजीच ठरणार आहे. इस्लामपूर नगरपालिकेसाठी १९७ अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी ५९ अर्ज अवैध ठरले असून, १३८ अर्ज वैध ठरले आहेत. नगराध्यक्ष पदासाठी एकूण ११ उमेदवारांचे अर्ज छाननीत वैध ठरले. राष्ट्रवादीचे विजयभाऊ पाटील, विकास आघाडीचे निशिकांत पाटील, तिसऱ्या आघाडीचे विश्वास सायनाकर यांच्यासह इतर ८ उमेदवारांचा यामध्ये समावेश आहे. विटा नगरपारिषदेत नगराध्यक्ष पदासाठी कॉँग्रेसमधून जयश्रीताई पाटील व त्यांच्या स्नुषा प्रतिभा पाटील यांचे अर्ज दाखल होते. परंतु, प्रतिभा पाटील यांच्या अर्जाला पक्षाचा एबी फॉर्म जोडण्यात आल्याने जयश्रीताई पाटील यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला. शिवसेनेतून आ. अनिल बाबर यांच्या स्नुषा शीतल अमोल बाबर व सविता तानाजी जाधव यांचे अर्ज होते. यावेळी सविता जाधव यांच्या अर्जाला शिवसेनेचा एबी फॉर्म नसल्याने त्यांचा अर्ज अवैध झाला, तर रासपमधून पूजा तारळेकर यांचा अर्ज वैध ठरला आहे. येथे एकूण १९७ अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी ९९ अवैध ठरले असून, ९८ अर्ज वैध झाले आहेत. आष्टा नगरपालिकेसाठी एकूण १५५ अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी सात अर्ज अवैध झाले असून, १४ वैध राहिले आहेत. स्मिता धनवडे व विशाल शिंदे यांच्याविरुद्ध उमेदवार बाद झाल्याने याठिकाणी बिनविरोध निवडणूक होणार का, याकडे लक्ष लागले आहे. लोकशाही आघाडीचे उमेदवार बाद झाल्याने सेनेचे वीर कुदळे यांनी न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले. खानापूर नगरपंचायतीच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी दाखल झालेल्या एकूण १२६ उमेदवारी अर्जांपैकी ४७ उमेदवारी अर्ज अवैध झाले. यामधील बहुतांशी अर्ज पक्षांचे अधिकृत फॉर्म न जोडल्योमुळे अवैध करण्यात आले. तर दोन उमेदवारी अर्ज इतर कारणांनी अवैध झाले, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुभाष बोरकर यांनी दिली. पलूस नगरपालिकेच्या १७ जागांसाठी १७७ जणांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी छाननीमध्ये ५८ अर्ज बाद झाले असून, ११९ उमेदवारांचे अर्ज राहिले आहेत. कडेगाव नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी १५५ अर्ज दाखल झाले होते. ६८ अर्ज अवैध झाले असून, ८७ अर्ज वैध राहिले आहेत. कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी १८६ अर्ज राहिले होते. त्यापैकी केवळ पाच अर्ज अवैध ठरले असून, उर्वरित १८१ अर्ज वैध राहिले आहेत. यामुळे येथील निवडणुकीत मोठी चुरस निर्माण होणार आहे. (प्रतिनिधी) तासगावमध्ये हरकती फेटाळल्या तासगाव नगरपालिका निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदासाठीचे २० अर्ज अवैध ठरले, तर १३ अर्ज कायम राहिले. नगरसेवकपदासाठी दाखल २१५ अर्जापैकी १०७ अर्ज अवैध, तर १०८ अर्ज वैध ठरले. राष्ट्रवादीच्या दोन उमेदवारांविरोधात भाजपने घेतलेला आक्षेप फेटाळण्यात आला. भाजपचे प्रभाग क्रमांक दहामधील उमेदवार दत्तात्रय रेंदाळकर यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार सचिन पाटील यांच्या अर्जावर आक्षेप घेतला होता. तर प्रभाग क्रमांक सहामध्ये भाजपचे उमेदवार सचिन माळी यांनी राष्ट्रवादीच्या रेहाना मुल्ला यांच्या अर्जाबाबत हरकत घेतली होती. मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून दोन्ही हरकती फेटाळण्यात आल्या. याची दिवसभर चर्चा होती.
निवडणुकीपूर्वीच ४५० जण बाद!
By admin | Published: November 02, 2016 11:57 PM