अशोक डोंबाळे । सांगली : जिल्ह्यातील २४८४ अंगणवाड्या आणि ४४६ मिनी अंगणवाड्यांपैकी ४५८ अंगणवाड्यांना ‘आयएसओ’ (आंतरराष्ट्रीय मानांकन प्रमाण) मिळाले आहे. यासाठी लागणाºया मूलभूत सुविधांसाठी सुमारे साडेचार कोटींचा खर्च झाला असून, सेविका आणि
मदतनीसांनी लोकप्रतिनिधी, ग्रामस्थांकडून ही मदत जमविली आहे. कॉर्पोरेट शाळांना लाजवेल अशी अंगणवाडी शाळांची इमारत, अतिशय सुसज्ज, देखण्या बोलक्या भिंती आहेत. अनेक अंगणवाड्यांनी कात टाकून त्या डिजिटल झाल्या आहेत.जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाकडील अंगणवाड्यांमध्ये दर्जेदार शिक्षण मिळू शकते, हे दाखविण्याचा सेविकांचा प्रयत्न सुरु आहे. याचाच एक भाग म्हणून येथील अंगणवाडी सेविका, मदतनीसांनी मूलभूत सुविधा वाढविण्यावर भर दिला आहे. यासाठी त्यांना महिला व बालकल्याण समितीच्या सभापती प्रा. डॉ. सुषमा नायकवडी, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिल्पा पाटील यांनीही प्रोत्साहन दिले आहे.
जिल्ह्यातील २४८४ अंगणवाड्या आणि ४४६ मिनी अंगणवाड्यांपैकी ४५८ अंगणवाड्यांना आयएसओ प्रमाणपत्र मिळाले आहे. लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, ग्रामपंचायतींचे सहकार्य व गावपातळीवरील लोकसहभागातून अंगणवाड्यांना आयएसओ मिळाले असल्याचे सेविका सांगत आहेत. जिल्ह्यातील ४५८ अंगणवाड्यांमध्ये मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी लोकसहभागातून सुमारे साडेचार कोटींचा निधी खर्च करण्यात आला आहे.या उपक्रमाचे पालकांमधूनही स्वागत होत आहे.
सेविका, मदतनीसांच्या कष्टामुळेच यशआयएसओ प्रमाणपत्र मिळविण्यासाठी सेविका आणि मदतनीसांनी प्रामाणिक लोकसहभागातून प्रयत्न केल्याचे हे यश आहे. शासकीय कोणताही निधी नसताना साडेचार ते पाच कोटींची कामे लोकसहभागातून केली आहेत, अशी प्रतिक्रिया महिला व बालकल्याण समिती सभापती प्रा. डॉ. सुषमा नायकवडी यांनी दिली.