मिरज : कवठेमहांकाळ तालुक्यात गेल्या दहा वर्षांपासून कामकाज बंद व अवसायनात असलेल्या ४६ सहकारी दूध संस्थांची नोंदणी रद्द करण्यात येणार आहे. जिल्हा सहकारी दुग्ध संस्था सहायक निबंधकांनी संबंधित संस्थांच्या सभासदांना नोंदणी रद्दच्या नोटिसा बजावल्या आहेत. दि. २६ सप्टेंबर रोजी मिरजेत जिल्हा दुग्धविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयात या संस्थांची अंतिम सर्वसाधारण सभा होणार आहे. सभासदांच्या हरकती-आक्षेपाचा विचार करून ४६ संस्थांची नोंदणी रद्द करण्यात येणार आहे.
कवठेमहांकाळ तालुक्यात सुमारे दोनशे सहकारी दूध संस्था आहेत. त्यापैकी गेली दहा वर्षे अवसायनात असलेल्या ४६ संस्थांना अंतिम नोटीस बजावण्यात आली आहे. या संस्थांची नोंदणी रद्द होणार आहे. यामध्ये कवठेमहांकाळ तालुक्यातील हनुमान दूध उत्पादक, गिरंदर, मयूर, धनलक्ष्मी, महावीर, वसंतदादा, आनंददादा, कमाबाई, शिवशक्ती, कामधेनू, श्रीराम, श्रीकृष्ण, सिद्धेश्वर, विठ्ठल, ओमकार, सिद्धनाथ, गुरूकृपा, विश्वजीत, जय तुळजाभवानी, संत गोराकुंभार, शिवाजी, जनसेवा, शिवप्रसाद, जय भवानी, भैरवनाथ, महालक्ष्मी, बलभीम, खरसिंग, गोपाळकृष्ण, नरसिंह, शिवनेरी, दत्त आणि शेतकरी सहकारी दूध उत्पादक या संस्थांचा समावेश आहे.
सहकारी कायद्यानुसार एखाद्या संस्थेवर अवसायक नियुक्त झाल्यानंतर दहा वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाल्यानंतर त्या संस्थेची नोंदणी रद्द करण्यात येते. कवठेमहांकाळ तालुक्यातील संबंधित ४६ सहकारी दूध उत्पादक संस्था या गेल्या दहा वर्षांपासून अवसायनात असून, त्यांचे कामकाज पूर्णपणे बंद आहे.
देणे-घेणे, दावे असल्यास हरकती नोंदवाव्यात
अवसायकाची मुदत संपत असल्याने सहकार कायद्यानुसार या संस्थांची नोंदणी रद्द करावी लागणार आहे. दुग्ध संस्थेच्या सहायक निबंधकांनी संबंधित संस्थांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. सोमवार, दि. २६ सप्टेंबर रोजी अंतिम सर्वसाधारण सभा होऊन संबंधित संस्थांकडून कोणाचे काही देणे-घेणे, दावे-आक्षेप असतील तर त्यांनी हरकती मांडाव्यात. मुदतीत कोणाचे आक्षेप न नोंदविले गेल्यास संबंधित संस्थांची नोंदणी रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.