सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघात दोन वेळा निवडून आलेले आणि तिसऱ्यांदा मैदानात उतरलेल्या खासदार संजय पाटील यांच्या नावावर स्थावर आणि जंगम मालमत्ता ४८ कोटी ३१ लाख ३९ हजार रुपये इतकी आहे. खासदार पाटील यांच्यापेक्षा पत्नीची जंगम मालमत्ता तब्बल ३० कोटी ५० लाखांनी अधिक आहे. पत्नी ज्योती यांनी जंगम मालमत्तेपैकी ३२ कोटी ३१ लाख रुपये असुरक्षित कर्ज म्हणून एसजीझेड ॲण्ड एसजीए शुगर कंपनी तुरचीला दिले आहेत.निवडणूक आली की, मतदारांना उमेदवारांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये उल्लेख केलेली मालमत्ता किती रुपयांची असेल, असा प्रश्न पडतो. सांगलीचे खासदार संजय पाटील यांनी २०१९ च्या निवडणुकीत त्यांची मालमत्ता १९ कोटी ११ लाख, ९२ हजार रुपये इतकी असल्याचे नमूद केले होते, तर तेव्हा २ कोटी ३३ लाख रुपये कर्ज असल्याचे जाहीर केले होते.तिसऱ्यांदा उमेदवारीसाठी अर्ज दाखल करताना खासदार पाटील यांनी प्रतिज्ञापत्रात जंगम मालमत्ता २ कोटी ४८ लाख ४५ हजार रुपये असल्याचे जाहीर केले आहे, तर स्थावर मालमत्ता ४५ कोटी ८२ लाख ९३ हजार रुपये इतकी आहे. उत्पन्नाचा स्रोत शेती आणि व्यवसाय, असा उल्लेख आहे. बँका व वित्तीय संस्थांकडील कर्ज ५३ कोटी २ लाख ५२ हजार रुपये इतके आहे. प्रतिज्ञापत्रातील आकडेवारीनुसार, मागील पाच वर्षांच्या तुलनेत मालमत्तेमध्ये २९ कोटी रुपयांची भर पडली असल्याचे दिसून येते, तसेच कर्जाचा आकडाही ५१ कोटी रुपयांनी वाढला आहे.
संजयकाकांकडे गाडीच नाहीखासदार संजयकाका यांनी प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची गाडी नसल्याचे नमूद केले आहे. त्यांच्याकडे दहा लाखाचे सोने, तर पत्नीकडे २४ लाखांचे सोने आहे.
एक गुन्हा दाखल२००५ मध्ये मनाई आदेश असताना बेकायदा सभा घेतल्याबद्दल खासदार संजय पाटील यांच्याविरुद्ध तासगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.