तासगाव : मणेराजुरी (ता. तासगाव) येथे पुन्हा एकदा द्राक्ष व्यापाऱ्यांनी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना गंडा घातला आहे. गावातील २१ द्राक्ष बागायतदारांची तब्बल ४९ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. व्यापारी पसार झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांनी तासगाव पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली आहे. सततच्या फसवणुकीने द्राक्ष उत्पादक हवालदिल झाले आहेत.द्राक्ष हंगाम सुरू झाल्यानंतर मणेराजुरी येथे काही व्यापाऱ्यांनी लाखो रुपयांचा गंडा घालून परागंदा झाल्याची एक घटना नुकतीच घडली असताना, गुरुवारी पुन्हा एकदा अशीच दुसरी घटना घडली आहे. गावातील २१ द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी एसटीसी एके फ्रुट सप्लायर्स अशा नावाने असलेल्या कंपनीच्या द्राक्ष व्यापाऱ्यांना द्राक्षाची विक्री केली होती. व्यापाऱ्यांनी एकाच वेळी अनेक शेतकऱ्यांची द्राक्ष खरेदी केली होती. काही शेतकऱ्यांचे थोडे पैसे दिले होते, तर काही शेतकऱ्यांना लवकरच पैसे देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र गुरुवारी हे व्यापारी मुक्कामास असल्याच्या ठिकाणी दिसून आले नाहीत. त्यांचे मोबाईल बंद होते. व्यापारी पसार झाल्याचे लक्षात आल्यानंतर, फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी तासगाव पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली आहे.
मणेराजुरीत द्राक्ष व्यापाऱ्यांचा ४९ लाखाला गंडा, फसवणुकीने द्राक्ष उत्पादक हवालदिल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2023 3:55 PM