विटा : आचारसंहिता पथकाने येथील यशवंतनगर परिसरात चारचाकी गाडीतून पाच लाखांची बेहिशेबी रोकड जप्त केली. याबाबत मिथुन जगदीश सगरे (रा. साळशिंगे रोड, विटा) याच्या विरुद्ध विटा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी आज, शुक्रवारी पत्रकारांना दिली. दरम्यान, आजअखेर आचारसंहिता भंगप्रकरणी खानापूर मतदारसंघातील २८ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचेही इथापे यांनी सांगितले.इथापे म्हणाले की, खानापूर मतदारसंघात आचारसंहिता भरारी पथकाचे प्रमुख डी. एस. राजमाने यांना मंगळवारी (दि. ७) येथील यशवंतनगर पाण्याच्या टाकीजवळ मतदारांना पैसे वाटप सुरू असल्याची माहिती मिळाली. मिथुन सगरे चारचाकी गाडीतून (एमएच १२ एफवाय ४१६५) पाच लाख रुपये घेऊन आल्याचे व गाडीत बेहिशेबी रोकड असल्याचे समजल्यानंतर राजमाने यांच्या पथकाने छापा टाकला. झडती घेतली असता त्या गाडीत पाच लाखांची बेहिशेबी रोकड मिळाली. ही रोकड व गाडी जप्त करून या प्रकरणाची पुढील चौकशी करण्यासाठी विटा पोलिसांत राजमाने यांनी रितसर अहवाल दिला. सगरेविरुद्ध गुन्हा नोंद करून विटा पोलिसांनी तपास सुरू केला आहे.खानापूर मतदारसंघात आचारसंहिता पथकाने आतापर्यंत राज्य उत्पादन शुल्कामार्फत अवैध दारू विक्री व निर्मितीचे-१६, वाहन गैरवापर-८, पोस्टर, बॅनर्ससंबंधी-१, रॅली संबंधित-१, टी-शर्ट वाटपाबाबत-१ व बेहिशेबी रोकड प्रकरणी-१ असे एकूण २८ गुन्हे दाखल केले आहेत. (वार्ताहर)
पाच लाखांची रोकड जप्त
By admin | Published: October 10, 2014 11:33 PM