सांगली : महापालिका क्षेत्रात अनेक मालमत्तांना करच लागू केलेला नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. घरपट्टी विभागाने सुरू केलेल्या शोधमोहिमेत गेल्या सात दिवसात ८८५ मालमत्तांना करच नसल्याचे समोर आले आहे. त्यापैकी १०३ जणांनी घरपट्टी विभागाकडे अर्ज करून मालमत्ता कर लागू करण्याची मागणी केली आहे.महापालिका क्षेत्रातील सर्वेक्षण केले असता, अनेक खुल्या जागा, बांधकामे यांना मालक, भोगवटादार यांनी महापालिकेकडून मालमत्ता कर आकारणी करुन घेतली नसल्याचे दिसून आले आहे.
महाराष्ट्र महापालिका अधिनियमानुसार सर्व खुल्या अथवा बांधीव मालमत्तांना कर आकारणी करुन घेऊन त्यांचा नियमित भरणा करणे बंधनकारक आहे. त्यासाठी मालमत्ता धारकांनी अर्ज दाखल करावेत, अन्यथा ३१ डिसेंबरपर्यंत जे मालमत्ताधारक नोंद करुन कर आकारणी करुन घेणार नाहीत, अशांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिला आहे.दरम्यान, घरपट्टी विभागाने कर न लागलेल्या मालमत्तांचा शोध सुरू केला आहे. गेल्या सात दिवसात केलेल्या सर्वेक्षणात ८८५ मालमत्तांना करच नसल्याचे समोर आले आहे. त्यापैकी १०३ जणांनी आयुक्तांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कर आकारणीसाठी महापालिकेकडे अर्ज केला आहे.
ज्या मालमत्ता धारकांनी अद्यापही मालमत्ता कर लावून घेण्यासाठी अर्ज सादर केला नाही, त्यांनी तात्काळ महापालिकेकडे अर्ज दाखल करून आपल्यावरील कायदेशीर कारवाई टाळावी, असे आवाहनही कापडणीस यांनी केले आहे.