आटपाडी (सांगली) : ‘मुलीचे लग्न तुझ्याशी लावून देतो’ असे सांगत तरुणाला स्वप्नांच्या दुनियेत रमवून एका कुटुंबाने त्याच्याकडून दहा लाखाहून अधिकची रक्कम उकाळल्याचा प्रकार आटपाडी तालुक्यात घडला. याबाबत तरुणाने पोलिस ठाण्यात तरुणी व तिच्या कुटुंबियांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
आटपाडी तालुक्यातील खांजोडवादी गावचा युवक अमर अप्पासो सूर्यवंशी याने दिलेल्या फिर्यादीनुसार स्नेहा नानासो मोरे, सौ. अलका नानासो मोरे, अविनाश नानासो मोरे, नानासो अर्जुन मोरे (सर्व रा. घनचक्कर मळा, दिघंची), सौ. प्रतिभा संतोष जाधव (रा. महूद ता. सांगोला) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, १२ मार्च २०२२ ते २२ डिसेंबर २०२२ या कालावधीत ही घटना घडली. स्नेहाशी लग्न लावून देतो असे सांगत तिच्या कुटुंबियांनी अमर सूर्यवंशीचा विश्वास संपादन केला. त्याच्याकडून विविध कारणासाठी वेळोवेळी रोख रक्कम व किमती साहित्य मोरे कुटुंबियांनी घेतले. दरम्यान अमरनेही भावी पत्नी म्हणून स्नेहाला अनेक महागड्या भेटवस्तू दिल्या. कुटुंबियांनीही त्यांच्याकडून अनेक वस्तू घेतल्या.
अविनाश मोरे यास सोने-चांदीचे दुकान सुरू करण्यासाठी १८ लाखांची मागणी मोरे कुटुंबाने अमरकडे केली होती. ते न दिल्यास स्नेहाचा विवाह लावून देणार नाही व आजवर दिलेले पैसे देणार नसल्याची धमकी त्यांनी दिली. या प्रकाराबाबत कोणाला काही सांगितल्यास आत्महत्या करण्याची धमकी कुटुंबातील सदस्यांनी दिली होती. त्यामुळे फसवणूक होऊनही अमर या धमकीने घाबरला होता. अखेर त्याने धाडस दाखवत आटपाडी पोलिसांत तक्रार दाखल केली. याबाबत मोरे कुटुंबाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल दादासाहेब ठोंबरे अधिक तपास करत आहेत.