नेलकरंजी : हिवतड (ता. आटपाडी) येथे लांडग्यांनी मेंढ्यांच्या काळपावर हल्ला करून ४५ मेंढ्यांचा फडशा पाडला, तर १६ मेंढ्या जखमी केल्या. गुरुवारी रात्री एक वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. यात सतीश शेळके (रा. कनेरवाडी, ता. करवीर, जि. कोल्हापूर) यांचे सुमारे सात लाख रुपयांंचे नुकसान झाले.सतीश शेळके यांनी कोल्हापूर जिल्ह्यात महापुराचे संकट आल्याने आणि सतत पाऊस येत असल्यामुळे हिवतड येथे मेंढ्या चारण्यासाठी आणल्या आहेत. हा मेंढ्यांचा कळप भिवघाट-आटपाडी रस्त्यापासून तीन किलोमीटर अंतरावर कवड्याचा डोंगर परिसरात खांडेकर वस्तीजवळ प्रकाश लक्ष्मण सरगर यांच्या शेतात बसविला होता. गुरूवारी रात्री एक वाजण्याच्या दरम्यान ९ ते १० लांडग्यांच्या कळपाने या मेंढ्यांवर जोरात हल्ला केला.
सतीश शेळके अचानक झालेल्या लांडग्यांच्या हल्ल्याने घाबरून गेले. तरीही आरडाओरड करीत मोठ्या धाडसाने जिवावर उदार होऊन त्यांनी लांडग्यांना दूर करण्याचा प्रयत्न केला. परंतु हा प्रयत्न निष्फळ ठरला. बघता बघता लांडग्यांनी ४५ मेंढ्यांचा फडशा पाडला.
शेळके यांनी मोठ्याने आरडाओरड करून परिसरातल्या लोकांना मदतीसाठी बोलाविले. परिसरातून काही लोक धावत आल्याने बाकीच्या शेळ्या-मेंढ्या बचावल्या. तरीही १६ मेंढ्यांना जखमी करून लांडग्यांचा कळप पसार झाला. रात्रीच्या अंधारामुळे आणि पाऊस पडत असल्याने आजुबाजूच्या शेतकरी बांधवांकडून तातडीने मदत होऊ शकली नाही.हिवतड गावचे सरपंच उमाजी सरगर, माणिकराव देशमुख आणि परिसरातील ग्रामस्थांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने वन विभाग कार्यालयास संपर्क साधून माहिती दिली. शुक्रवारी सकाळी आठ वाजता वन कार्यालयातील क्षेत्रपाल सुप्रिया तीरगावे, वनपाल पी. बी. भालके, वनरक्षक संजय कारे, काका सरगर यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार सचिन लंगोटे आणि पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश चव्हाणही घटनास्थळी दाखल झाले. याचा पंचनामा केला असून जखमी मेंढ्यांवर उपचार करण्यात आले. समाजकल्याण विभागाचे सभापती ब्रम्हानंद पडळकर, पंचायत समिती सदस्य रूपेश पाटील यांनी भेट देऊन, शेळके यांना शासनाची मदत देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.