सांगली : क्रांतीची मशाल मनात पेटवून ब्रिटिशांविरोधात आंदोलनाचे अग्निकुंड पेटविणाºया सांगलीतील क्रांतिकारकांनी देशात इतिहास घडविला. त्यांनी गाजविलेल्या अनेक शौर्याच्या घटनांनी ब्रिटिश साम्राज्याला हादरवले. यामध्ये वसंतदादा पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगलीचा जेल फोडण्याची घटना सर्वाधिक गाजली. या घटनेला बुधवारी २४ जुलै रोजी ७६ वर्षे पूर्ण होत आहेत. हा दिन शौर्यदिन म्हणून साजरा करण्याचे नियोजन पुरोगामी संघटनांच्यावतीने करण्यात आले आहे.
वसंतदादा पाटील यांनी त्यावेळी क्रांतिकारकांच्या फळीचे नेतृत्व केले होते. ही घटना इतिहासातील सर्वात गाजलेली घटना म्हणून ओळखली जाते. २४ जुलै १९४३ रोजी सांगलीचा जेल फोडून वसंतदादा व त्यांच्या सहकाºयांनी ब्रिटिशांविरोधात आंदोलन तीव्र केले. सांगलीच्या जुन्या किल्ल्यात त्यावेळी उभारण्यात आलेले जेल आजही त्याचठिकाणी या ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार म्हणून उभे आहे. सभोवताली भक्कम तटबंदी व त्यापलीकडे खंदक... जागोजागी सशस्त्र पोलिसांचा पहारा... असे त्यावेळचे जेलचे चित्र होते. वसंतदादा पाटील यांना स्वतंत्र खोलीत ठेवण्यात आले होते व त्यांच्यावर विशेष पाळत होती. दिवसातून दोनवेळा शौचासाठी म्हणून त्यांना बाहेर आणले जात होते. त्यांच्याबरोबर त्यावेळी जेलमध्ये हिंदुराव पाटील, गणपतराव कोळी, जयराम कुष्टे, जिनपाल खोत, सातलिंग शेटे, महादेवराव बुटाले, वसंत सावंत, मारुती आगलावे, अण्णासाहेब पत्रावळे, बाबूराव जाधव, विठ्ठल शिंदे, जयराम बेलवलकर, दत्तात्रय पाटील, नामदेव कराडकर, कृष्णा पेंडसे, बाबूराव पाचोरे, तात्या सोनीकर हे सहकारी होते.
एका चित्रपटातील कथेला शोभेल यापद्धतीने जेल फोडण्याचे नियोजन करण्यात आले होते. अण्णासाहेब पत्रावळे आणि बाबूराव जाधव हे त्यावेळी अल्पवयीन होते, त्यामुळे त्यांना तुरुंगात थोडीफार मोकळीक असायची. वसंतदादा पाटील आणि हिंदुराव पाटील यांच्या डोक्यातून बनलेले सांकेतिक भाषेतील संदेश इतरांपर्यंत पोहोचवण्याचे काम ते करत होते. नियोजन ठरले आणि तारीखही ठरविण्यात आली. २४ जुलैरोजी दुपारी अडीच वाजता वसंतदादांना शौचासाठी बाहेर आणल्यानंतर सांकेतिक भाषेत क्रांतिकारकांनी एकमेकांना संदेश दिला आणि त्याठिकाणच्या पोलिसांना मारुन बंदुका घेऊन क्रांतिकारी पळू लागले. तटावरून पाण्याने भरलेल्या खंदकात सर्वप्रथम जिनपाल खोत यांनी उडी मारली. इतर क्रांतिकारकांनीही उड्या मारल्या.
हिंदुराव पाटील तटावर पाय रोवून उभे होते. सर्व क्रांतिकारक तटावरून उतरेपर्यंत एकाही पोलिसाला पुढे येऊ दिले नाही.सगळ्यात शेवटी त्यांनी खंदकात उडी मारली; मात्र दुर्दैवाने त्यांची उडी चुकली व काठावरच्या दगडाचा मार त्यांना लागला. तसेच उठून पळण्याचा त्यांनी प्रयत्न केला, मात्र त्यांचे दोन्ही पाय निकामी झाले होते. दोन क्रांतिकारक वगळता अन्य सर्वजण पोलिसांना सापडले. यात दोघेजण शहीद झाले. या घटनेला बुधवारी ७६ वर्षे पूर्ण होत आहेत.कार्यकर्त्यांकडून जागर...सांगलीच्या ‘कष्टकºयांची दौलत’ येथे बुधवार, दि. २४ जुलै रोजी दुपारी २ वाजता शौर्यदिन कार्यक्रम होणार आहे. अॅड. के. डी. शिंदे प्रमुख वक्ते म्हणून, तर प्रा. शरद पाटील अध्यक्षस्थानी उपस्थित राहणार आहेत. भाई व्ही. वाय. आबा पाटील, अॅड. भाई सुभाष पाटील, प्राचार्य डॉ. अमर पांडे, प्रा. संपतराव गायकवाड, नामदेवराव करगणे, साथी सदाशिव मगदूम, साथी विकास मगदूम, प्रा. आर. एस. चोपडे, चंद्रकांत लोंढे आदी उपस्थित राहणार आहेत.घटनेचे स्मारक व चौकाच्या नामकरणाची प्रतीक्षाक्रांतिकारकांच्या उडीच्या अमृतमहोत्सवानिमित्त गतवर्षी ‘लोकमत’ने या घटनेवर प्रकाशझोत टाकताना या ऐतिहासिक घटनेचे स्मारक तसेच एखाद्या चौकाला ‘२४ जुलै’ असे नाव देण्याच्या सूचनेचा उल्लेख केला होता. शौर्यदिनाच्या कार्यक्रमातून आता पहिले पाऊल सांगलीत टाकण्यात आले असले तरी, स्मारक व चौक नामकरणाचे महत्त्वाचे पाऊल अद्याप पडलेले नाही. सांगलीतील लोकप्रतिनिधी, महापालिका व संघटनांनी त्यासाठी पुढाकार घेऊन नव्या पिढीसाठी हे पाऊल उचलणे गरजेचे आहे.