सांगली : महापालिकेच्या घरपट्टीच्या थकबाकीचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. डिसेंबरअखेरपर्यंत घरपट्टी विभागाने १९ कोटी २९ लाख रुपयांची वसुली केली असून, अजून ५० कोटी रुपयांची थकबाकी आहे. गेल्या नऊ महिन्यात केवळ २७.४३ टक्के वसुली झाली आहे. उर्वरित तीन महिन्यात किमान ८० टक्के वसुलीचे आव्हान महापालिकेसमोर आहे. महापालिकेने यंदा घरपट्टी विभागाला ३५ कोटी रुपयांचे उद्दिष्ट दिले होते. त्यात संगणक प्रणाली बंद झाल्याने गेल्या वर्षभरापासून घरपट्टीच्या बिलांचा घोळ कायम होता. चालूवर्षी महापालिकेने नागरिकांना वर्षात दोन बिले भरण्याची सोय केली आहे. सहा महिन्यांच्या बिलाचे वाटप करण्यात आले आहे. वेळेवर घरपट्टी भरण्यासाठी करात सवलतही दिली आहे. पण त्याचा फारसा उपयोग झाल्याचे दिसून येत नाही. त्यात घरपट्टी विभागाकडे कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे. थकबाकीचा डोंगर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गतवर्षी मार्चअखेरीस घरपट्टीच्या वसुलीला वेग आला होता. या विभागाची सूत्रे उपायुक्त सुनील नाईक यांच्याकडे सोपविण्यात आल्यानंतर गेल्यावर्षी ५० टक्क्यापर्यंत वसुली गेली होती. यंदा मात्र घरपट्टीची वसुली होत नसल्याने महापालिका हवालदिल झाली आहे. एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्यात नागरिकांनी घरपट्टीला फारसा प्रतिसाद दिलेला नाही. सांगली, मिरज व कुपवाड या तीन शहरांची घरपट्टीची थकबाकी ७० कोटीच्या घरात आहे. त्यात वर्षानुवर्षे थकबाकीचा आकडा ३७ कोटी आहे. त्यापैकी १९ कोटी रुपये वसूल झाले आहेत. नऊ महिन्यात केवळ २७ टक्के वसुली होऊ शकली आहे. घरपट्टीच्या दंडाचा आकडा वाढतच चालल्याने थकबाकीचे आकडे मोठे दिसत असल्याचे प्रशासन सांगते. पण थकबाकी वसुलीसाठी प्रशासनाकडून प्रयत्न होताना दिसत नाहीत. मार्च जवळ आला की वसुलीच्या मोहिमा निघतात. त्यानंतर पुन्हा मार्च उजाडण्याची वाट पाहिली जाते. त्यात घरपट्टीच्या थकबाकीवर दरमहा २ टक्के दंड आकारला जात आहे. या पठाणी दंड वसुलीला नागरिकांचा विरोध आहे. (प्रतिनिधी) वसुली करा : अन्यथा पगार थांबवू मार्च महिन्यानंतर एलबीटीचे अनुदान थांबणार आहे. त्यामुळे महापालिकेला स्वत:च्या उत्पन्नाचे स्रोत बळकट करावे लागणार आहेत. घरपट्टीसह इतर करांची थकबाकी वसूल करण्यासाठी पाठपुरावा करण्याची गरज आहे. त्यासाठी पुरेसा कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देणार आहोत. एलबीटी वसुलीबाबत अधिकाऱ्यांची बैठक घेतली. आठ दिवसांत बांधकामावरील एलबीटी वसुलीचे आदेश दिले आहेत. पन्नास टक्के वसुली झाली नाही, तर कर्मचाऱ्यांचे पगार थांबविले जातील, असा इशारा महापौर विवेक कांबळे यांनी दिला. थकबाकीचा आढावा (आकडे कोटीत) विभाग थकबाकी चालू मागणी एकूण सांगली २४.४५ २२.४४ ४६.९० मिरज १०.०५ ८.१५ १८.२० कुपवाड २.६२ २.६१ ५.२४ एकूण ३७.१४ ३३.२० ७०.३५ वसुलीचा आढावा (आकडे कोटीत) विभाग थकबाकी चालू मागणी एकूण सांगली ५.०३ ७.९३ १२.९६ मिरज १.७५ २.७२ ४.४८ कुपवाड ४६.२७ लाख १.०१ १.४७ एकूण ७.२५ ११.६६ १८.९२
घरपट्टीची थकबाकी ५० कोटींवर
By admin | Published: January 05, 2016 12:53 AM