सांगली : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर खरेदीसाठी ग्राहकांकडून मिळालेल्या चांगल्या प्रतिसादामुळे व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले. बाजारपेठेवर मंदीचे सावट आणि दुष्काळी परिस्थिती असतानाही, पाडव्याने बाजारपेठेला चांगलाच हात दिला. यात वाहन खरेदीकडे ग्राहकांचा ओढा जास्त होता. त्यामुळे यंदा वाहन विक्रीत दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. अबकारी कर मागे घेण्याच्या मागणीमुळे सराफ बाजार बंद असल्याने त्यातील उलाढाल मात्र ठप्प होती. यंदा पाडव्याला नवीन अठराशे ते दोन हजारावर दुचाकी, तर पाचशे चारचाकी वाहने रस्त्यावर आली. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती व मंदीच्या सावटाखाली बाजारपेठ असतानाही वाहने, इलेक्ट्रॉनिक वस्तूंची समाधानकारक विक्री झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. आॅटोमोबाईल बाजारपेठेत सरासरी १८ कोटींची उलाढाल झाल्याचे दिसून आले. खरेदीमध्ये दुचाकी वाहने, एलसीडी टीव्ही, लॅपटॉप आणि घरगुती उपयोगाच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंना जास्त मागणी होती. यावर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने खरेदीला यथातथाच प्रतिसाद मिळेल, अशी शक्यता होती. मात्र, दुष्काळाचा तितकासा परिणाम दिसून आला नाही. यंदाच्या गुढीपाडवा सणाच्या उत्साहात भर घालण्यासाठी फायनान्स कंपन्यांनी सुलभ कर्ज पुरवठा केल्याने मोटारसायकलींच्या विक्रीत चांगली वाढ झाल्याचे दिसून आले. दुचाकींमध्ये हिरोच्या जवळपास ९५० गाड्यांची विक्री झाली. सिध्दिविनायक हिरोचे श्रीकांत तारळेकर यांनी सांगितले की, शोरूम व आमच्या सबडीलरकडून हजारच्या वर वाहनांची विक्री झाली आहे. बाजारावर मंदीचे सावट असले तरी, खरेदीला ग्राहकांनी अपेक्षेपेक्षा चांगला प्रतिसाद दिला. दुष्काळाचा फटका जाणवला नाही. पोरेज टीव्हीएसचे अविनाश पोरे म्हणाले, पाडव्याला ग्राहकांनी खूपच चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे मंदी जाणवली नाही. टीव्हीएस च्या ४२९ गाड्यांची विक्री झाली. मंदी थोडीफार असली तरी ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. दुष्काळी परिस्थिती जाणवली नाही. चारचाकी गाड्यांमध्ये मारूती सुझुकीने दरारा कायम ठेवल्याचे दिसून आले. मारूतीच्या गाड्यांची विक्री झाल्याचे चौगुले इंडस्ट्रिजचे सिनीयर सेल्स मॅनेजर नीलेश पोतदार यांनी सांगितले. इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये एलईडी टीव्हींना जादा मागणी असल्याचे दिसून आले. अनेक कंपन्यांनी जुन्या टीव्हीच्या बदल्यात एल.ई.डी.ची योजना ठेवल्याने ग्राहकांचा टीव्ही एक्स्चेंजकडे कल दिसून आला. इलेक्ट्रॉनिकमध्ये एक कोटींपर्यंत उलाढाल झाली. बाजारात नव्याने आलेल्या फोर के एल.ई.डी.टीव्हीला चांगली पसंती होती. ग्राहकांचा फायनान्स योजनेकडे जादा ओढा असल्याचे दिसून आले. गेल्या काही वर्षापासून एल.ई.डी.च्या विक्रीत वाढच होत असल्याचे सुयोग राजेंद्र डिजिटलचे विजय लड्डा यांनी सांगितले. वाढता उन्हाळा लक्षात घेता, फ्रिजची विक्री जास्त झाली. अजूनही फ्रिजची विक्री वाढणार असल्याचे संकेत फ्रिज विक्रेत्यांनी दिले. वीस ते ५० हजार रुपयांपर्यंतच्या एलईडींना मागणी होती. त्याचबरोबर कुलर, पंख्यांनाही मागणी होती. लहान स्वरूपाच्या आटा चक्कीला बऱ्यापैकी मागणी होती. तसेच पाच हजारपासून २५ हजारपर्यंतच्या मोबाईलना ग्राहकांकडून मागणी होेती. (प्रतिनिधी) कमी व्याजदरात सुलभ हप्ता, अशा योजना वित्तीय संस्थांनी ग्राहकांना उपलब्ध करून दिल्याने ग्राहकांनी दुचाकी वाहनांची चांगली खरेदी केल्याचे दिसून आले. लहान व घरातील प्रत्येकाला वापरता येतील अशा वाहनांच्या खरेदीकडे ग्राहकांचा ओढा दिसून आला. त्यामुळेच दुचाकी गाड्यांची चांगली विक्री झाली. सांगली जिल्ह्यात बहुतांशी ठिकाणी चांगली उलाढाल आहे. - श्रीकांत तारळेकर, संचालक, सिध्दीविनायक हिरो.४पाडव्याच्या मुहूर्तावर स्थावर मिळकतींमध्ये गुंतवणूक करण्याकडेही ग्राहकांचा ओढा दिसून आला. बांधकाम क्षेत्रावर काही प्रमाणात मंदीचे सावट असले तरी, अनेकांनी फ्लॅटच्या बुकिंगसाठी पाडव्याचा मुहूर्त साधला. पुढील महिन्यात असणाऱ्या अक्षय्यतृतीयेला आणखी प्रतिसाद वाढण्याची शक्यता बांधकाम व्यावसायिकांनी व्यक्त केली.
जिल्ह्यात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ५० कोटींची उलाढाल
By admin | Published: April 08, 2016 11:32 PM