जिल्ह्यात व महापालिका क्षेत्रात एप्रिल महिन्यात कोविड रुग्णांची संख्या दररोज वाढत असून मिरज शासकीय कोविड रुग्णालयातील खाटा संपत आल्या आहेत. खासगी कोविड रुग्णालयातही निम्म्या खाटा भरल्या आहेत. मिरज सिव्हिल व खासगी रुग्णालये फुल्ल झाल्यानंतर रुग्णांची अडचण होणार आहे. महापालिकेने सांगलीत आदिसागर कोविड रुग्णालय बंद केले आहे. आता पुन्हा रुग्णसंख्या वाढत असल्याने कोविड रुग्णांवर उपचारासाठी मिरज शासकीय तंत्रनिकेतन इमारतीत कोविड रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. १२५ खाटांची क्षमता असलेल्या या रुग्णालयात ५० रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. येथे सध्या महापालिकेचे डाॅक्टर उपचार करीत असून गरज पडल्यास खासगी डाॅक्टरांचीही मदत घेण्यात येणार असल्याचे महापालिका उपायुक्त स्मृती पाटील यांनी सांगितले. आणीबाणीच्या प्रसंगासाठी व रुग्णांसाठी खाटा अपुऱ्या पडल्यास धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी असलेली व महात्मा फुले आरोग्य योजना लागू असलेल्या सांगली मिरजेतील खासगी रुग्णालयात कोविड रुग्णांवर उपचार सुरू करण्याचे प्रशासनाचे नियोजन सुरू असल्याची माहिती मिळाली. सिव्हिलमध्ये दररोज येणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त व बरे होऊन जाणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी असल्याने रुग्णालयावरील ताण दररोज वाढत आहे.
कोविड रुग्णासाठी खासगी रुग्णालये उपचार सुविधा देण्यास तयार असल्याचे मिरज आयएमएचे अध्यक्ष डाॅ. शशिकांत दोरकर यांनी सांगितले.
चाैकट
उपचारासाठी मिरजेतील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी २५० खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. येथे कोरोनाबाधित ५० रुग्ण उपचार घेत आहेत.