सांगली : महापालिका क्षेत्रातील रस्त्यांवर सुमारे दीडशे बेवारस वाहने पडून आहेत. या वाहनमालकांना नोटिसा बजावल्या असून, दररोज पन्नास रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. वेळप्रसंगी ही वाहने उचलून त्यांचा लिलाव करण्यात येणार असल्याचा इशारा आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी दिला.ते म्हणाले, प्रमुख रस्त्यांवरील बेवारस वाहनांसंदर्भात महापालिका व पोलीस प्रशासनाची बैठक झाली होती. या बैठकीत बेवारस वाहनांचे सर्वेक्षण करण्याबाबत पोलीस विभागाकडून सूचना आल्या होत्या. त्यानुसार महापालिका प्रशासनाने शहरातील बेवारस वाहनांचा सर्व्हे केला आहे. त्यामध्ये सांगली, मिरज व कुपवाड शहरात दीडशे वाहने आढळून आली.
उपप्रादेशिक कार्यालयाकडे या वाहनांचे नंबर देण्यात आले होते. त्या नंबरवरून वाहनमालकांची नावे महापालिका प्रशासनाला मिळाली आहेत. या वाहनमालकांना नोटिसा बजावल्या आहेत. त्यांच्यावर दरारोज पन्नास रुपयेप्रमाणे दंड आकारण्यात येणार आहे.
वाहनमालकांनी दंडाची रक्कम भरून वाहने रस्त्यांवरून बाजूला करावीत, अन्यथा महापालिकेच्या पथकाच्यावतीने ही वाहने ताब्यात घेऊन त्यांचा लिलाव केला जाईल, असा इशारा खेबूडकर यांनी दिला.