मिरज : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. बुधवारी आणखी ५० विद्यार्थांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्याने तीन दिवसात ८२ रुग्ण सापडले आहेत. सर्व बाधित विद्यार्थ्यांची प्रकृती चांगली असून, खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात परस्परांच्या संपर्कात आलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींपैकी एकशेदहा जणांच्या कोरोना चाचणीत बुधवारी आणखी ५० जण कोरोनाबाधित आढळल्याने खळबळ उडाली आहे. दि. २५ रोजी मुलींच्या वसतिगृहातील नाताळच्या पार्टीनंतर कोरोनाचा फैलाव झाल्याचा संशय आहे. शनिवारपासून येथे दरारोज कोरोनाबाधित विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. शासकीय रुग्णालय प्रशासनाने सुमारे दोनशे विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी केली. त्यात आतापर्यंत ८२ जण पाॅझिटिव्ह आले आहेत. यापैकी आणखी काही जणांचा अहवाल आलेला नाही.
कोरोनाबाधितांच्या घशातील स्रावाचे पुणे येथील प्रयोगशाळेत ओमायक्राॅन तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. या तपासणी अहवालाचीही प्रतीक्षा आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुमारे आठशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यापैकी निम्मे वसतिगृहात वास्तव्यास आहेत. आंतरवासिता विद्यार्थिनी वसतिगृहातून कोरोनाची सुरुवात झाल्यानंतर आता विद्यार्थिनींसोबत विद्यार्थ्यांनाही लागण झाल्याचे आढळले आहे. बाधितांची संख्या वाढत असल्याने वैद्यकीय क्षेत्रासह शहरात खळबळ उडाली आहे.