सांगली : जिल्ह्यातील ८६ गावे आणि ६४१ वाड्या-वस्त्यांवरील नागरिकांना १०९ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू हाेता. पण, जून महिन्यात झालेल्या पावसामुळे ५० टँकर बंद केले असून, सद्या ५९ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. जिल्ह्यातील चारा टंचाईची तीव्रताही कमी झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.डॉ. राजा दयानिधी म्हणाले, ८६ गावे त्याखालील ६४१ वाड्या-वस्त्यांवरील दोन लाखांपर्यंतच्या लोकसंख्येला रोज १०९ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. काही पशुधनालाही टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. पण, जून महिन्यात जिल्ह्यात सरासरी २११ मिलिमीटर पाऊस झाला आहे. सर्वाधिक चांगला पाऊस झाल्यामुळे ७१ टक्क्यांपर्यंत खरीप हंगामातील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.पाऊस चांगला झाल्यामुळे ३५ गावे आणि २३४ वाड्या-वस्त्यांवरील ५० टँकर कमी झाले आहेत. सद्या जिल्ह्यातील जत आणि आटपाडी तालुक्यातील ५१ गावे आणि ४०७ वाड्या-वस्त्यांवर ५९ टँकरद्वारे पाणीपुरवठा चालू आहे. जिल्ह्यात कुठेही चाराटंचाई नाही. पुरेसा चारा उपलब्ध आहे.
बोगस बियाणे, खत विक्रेत्यांवर कारवाईजिल्ह्यात खरीप हंगामातील पेरणीला गती मिळाली आहे. या पेरणीच्या गडबडीत बोगस बियाणे, रासायनिक खते आणि कीटकनाशकांची विक्री होऊ नये, यासाठी कृषी विभागाचे ११ पथके लक्ष ठेवून आहेत. यातून काही बोगस बियाणे, खते आढळून आल्यास शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय आणि कृषी विभागाकडे तत्काळ तक्रार करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले आहे.