सांगली : जिल्ह्यात १०० टक्के पेरण्या झाल्या नसल्या तरी हंगामासाठी आलेले खते, बियाणे आणि किटकनाशकांमध्ये अप्रमाणितपणा (बोगस) आढळून आले आहेत. जिल्ह्यातील बहुतांशी दुकानांमध्ये विक्रीसाठी आलेल्या एक हजार ४०० नमुन्यांची तपासणी केली असून त्यामध्ये खतांचे ३८, बियाणे ९ आणि किटकनाशकांचे ५ नमुने बोगस असल्याचे स्पष्ट झाले. तपासणीमध्ये त्रुटी आढळल्याने ५२ नमुन्यांप्रकरणी न्यायालायत दावा दाखल केल्याचे कृषी विभागाने सांगितले.खरीप हंगामासाठी कृषी विभागाने खते आणि बियाण्यांची मागणी केली आहे. खतांचा पुरवठा आणि विक्री होताना शेतकर्यांना त्रास होणार नाही, याबाबतची दक्षता घेण्यात आली. जिल्ह्यात खताचे होलसेल व किरकोळ असे मिळून पाच हजार १७५ वितरक आहेत. हंगामाच्या पार्श्वभूमीवर मे महिन्यापासून नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले होते. निविष्ठा गुणनियंत्रण कामकाजासाठी जिल्ह्यात गुणनियंत्रण निरीक्षक व अकरा भरारी पथका मार्फत निविष्ठा वितरकांचे तपासणी व बियाणे खते औषधे नमुने काढण्याची कार्यवाही केली. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जे वितरक विहित कालमर्यादेत परवाना नुतनीकरण केलेले नसल्याचे स्पष्ट झाले. परवान्याची मुदत संपल्यानंतरही दुकानातून विक्री करण्यात आली त्यांच्यावर कारवाई केली होती.पेरण्या झाल्या नसल्या तरी कृषी सेवा केंद्रामध्ये विक्रीसाठी आलेल्या खते, बियाण्यांची तपासणी कृषी विभागाकडून करण्यात आली आहे. जिल्ह्यात तीन प्रकारच्या सुमारे चौदाशे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. तपासणीसाठी खतांचे तब्बल एक हजार १०० नमुने तपासले असून त्यापैकी ३८ नमुने अप्रमाणित असल्याचे आढळून आले. बियाण्यांचे ३३५ नमुन्यांनंतर ९ बोगस आणि किटकनाशकांचे २१३ नमुन्यांची तपासणी केली, त्यामध्ये पाच नमुने बोगस असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे सदोष खते, बियाणे आणि किटकनाशकास विक्री बंदचे आदेश देण्यात असून याप्रकरणी संबंधित कंपन्यांविरोधात न्यायालयात दावा दाखल करण्यात आला असल्याचे कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले.जादा दराने विक्री तरीही कारवाईकडे दुर्लक्षकृष्णा आणि वारणा नदीकाठी पाण्याची सुविधा असल्याने जिल्ह्याच्या पश्चिम भागात पेरण्या पूर्ण झाल्या. परंतु पूर्व भागाला पावसाने हुलकावणी दिली आहे. त्यामुळे एक लाख हेक्टर क्षेत्र नापेर राहिले. जिल्ह्यात युरिया खताचा मुबलक साठा उपलब्ध असतानाही वाळवा, शिराळा, तासगाव तालुक्यातील शेतकर्यांना युरियाची गोणी जादा दराने विकत घ्यावे लागली होती. याकडे कृषी विभागाने दुर्लक्ष का केले, असा सवालही शेतकऱ्यांनी केला आहे.
सांगली जिल्ह्यात ५२ बोगस खते, बियाण्यांबद्दल न्यायालयात दावा; कृषी विभागाची कारवाई
By अशोक डोंबाळे | Published: September 19, 2023 6:46 PM