बाळासाहेब चव्हाण फायनान्स कंपनीतील सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. त्यांचा मुलगा विमा कंपनीत एजंट आहे. चव्हाण यांनी सोमवारी सकाळी अकरा वाजता शिवाजी रोड येथील बँकेतून दीड लाख रुपये काढले. पैशांची बॅग व त्यांचे पाकीट कापडी पिशवीत ठेवले. त्यानंतर लोकमान्य बँकेच्या शाखेत जाऊन ५० हजार खात्यावर जमा केले. त्यानंतर जिलेबी चौक येथे अंत्योदय निधी बँकेत पैसे जमा करण्यासाठी गेले. त्यावेळी चव्हाण यांनी दुचाकी बँकेसमोर उभी केली होती. बँकेत ५० हजार रुपये खात्यावर जमा करून उर्वरित ५० हजार रुपये व दोन हजार रुपये असलेले पाकीट कापडी पिशवीत ठेवले. पिशवीसह बँकच्या बाहेर दुचाकीजवळ आले असता दुचाकीच्या सीटवर घाण पडली होती. ५२ हजार रुपये असलेली पिशवी गाडीला अडकवून गाडीवर पडलेली घाण साफ करण्यासाठी ते बाजूला पडलेली वाळू आणण्यासाठी गेले. परत आले असता त्यांची गाडीला अडकवलेली बॅग अज्ञाताने लंपास केली होती. ५० हजार रुपये रोख, पाकिटात ठेवलेले दोन हजार, बँकेचे एटीएम असे ५२ हजार असलेली बॅग चोरून नेल्याप्रकरणी चव्हाण यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
मिरजेत दुचाकीवर घाण टाकून ५२ हजार लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2021 4:32 AM