सांगली : कोल्हापूर वन्यजीव विभागामार्फत सागरेश्वर अभयारण्यातील आठ पाणस्थळावर २३ मे रोजी प्राणीगणना करण्यात आली. यामध्ये १७१ चितळ, २२० सांबर आणि केवळ चार सशांचे दर्शन झाले. या प्राणीगणनेमध्ये १४ वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासह आठ स्वयंसेवकांनी सहभाग घेतला.वन्यजीव विभागामार्फत दरवर्षी मे महिन्यामध्ये बुध्द पौर्णिमेच्या दिवशी सागरेश्वर अभयारण्यात प्राणीगणना करण्यात येते. प्राणीगणनेमध्ये निसर्गप्रेमिंना एक दिवस जंगलात राहण्याचा तसेच प्राण्यांचे दर्शन, आवाज, वनसंपदा व जैवविविधतेचा अनुभव घेता येतो. वन्यप्राणी व जंगलामध्ये वनविभागामार्फत करण्यात येत असलेली कामे, वनसंपदा टिकविण्यासाठी वनविभागाकडून करण्यात येत असलेले प्रयत्न याची जवळून माहिती निसर्गप्रेमिंना मिळते. त्यांच्याकरिता या दिवसाचा अनुभव कायम स्मरणात राहणारा असतो.वन्यजीव विभागामार्फत राबविण्यात आलेल्या प्राणीगणनेत मुंगूस १, माकड ७१, रानडुक्कर २८, चितळ १७१, ससा ४, सांबर २२०, साळिंदर ७, मोर ११, कोल्हा ५ आणि घोरपड ५ या प्राण्यांचे दर्शन झाल्याची माहिती कोल्हापूर विभागीय वन अधिकारी (वन्यजीव) एस. एस. पवार यांनी दिली आहे.
Sangli: सागरेश्वर अभयारण्यात साळिंदर, सांबरासह ५२३ प्राण्यांचे दर्शन
By अशोक डोंबाळे | Published: May 31, 2024 7:00 PM