सांगली : जिल्ह्यासह शेजारच्या कर्नाटकात गुन्हे करणाऱ्या दोघांना पोलिसांनी जेरबंद केले. अक्षय लक्ष्मण कांबळे (वय २७, रा. सुभाषनगर, ता. मिरज) व महंमद हुसेन उर्फ हनिसिंग उर्फ मच्छर महमंदगौस शेख (रा. धारवाड, कर्नाटक) अशी संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून जिल्ह्यातील चार घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून, पाच लाख ३७ हजार ३०० रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.जिल्ह्यातील घरफोडीच्या गुन्ह्यात वाढ होत असल्याने कारवाईच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार एलसीबीचे पथक सांगली शहरात गस्तीवर होते. यावेळी पथकाला माहिती मिळाली की, संशयित दोघे सोन्याचे दागिने विक्री करण्यासाठी बाहेर जाणार आहेत. त्यासाठी ते सुभाषनगर येथील कमानीजवळ थांबल्याचे समजताच पथकाने तिथे जात दोघांना ताब्यात घेतले.
सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. यानंतर मात्र, त्यांनी विश्रामबाग, कुपवाड एमआयडीसी, मिरज ग्रामीण आणि शहापूर (जि. कोल्हापूर) येथे चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर दोघांकडून पाच लाख ३७ हजार ३०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.एलसीबीच्या पथकाने ताब्यात घेतलेला संशयित शेख हा रेकाॅर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्यावर विद्यानगर, धारवाड येथे पाच घरफोडी, हुबळी, हुक्केरीत प्रत्येकी एक गुन्हे दाखल आहेत. एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दीपक गायकवाड, चेतन महाजन, हेमंत ओमासे, संदीप नलावडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.