संतोष भिसेसांगली : देशभरात नव्याने तब्बल ५५ हजार ६४९ पेट्रोल पंप सुरू होणार आहेत. तेल कंपन्यांनी तशा जाहिराती नुकत्याच प्रकाशित केल्या. त्यामध्ये महाराष्ट्रातील ५,१४९ पंपांचा समावेश असून, याबाबत पेट्रोल पंप चालक संघटनेने (फामपेडा) तीव्र चिंता व्यक्त केली आहे.नव्या पंपांमुळे रोजगार निर्मिती आणि नवीन व्यवसायाच्या संधी मिळण्याचा हेतू सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षात मात्र त्याचा प्रतिकूल परिणाम होणार असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. अनेक पंपांना टाळे लागण्याची भीती आहे.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विजेवरील तसेच इथेनॉलवरील वाहनांना उत्तेजन मिळून पेट्रोल, डिझेलवरील वाहने लवकरच बंद होणार असल्याचे सूतोवाच वेळोवेळी केले आहे. या स्थितीत नव्याने अर्धा लाखभर पंप सुरू करण्यामागे हेतू काय, असा प्रश्न ‘फामपेडा’ने उपस्थित केला आहे.
८० हजारांहून अधिक पंप सध्या देशभरात आहेत८० टक्के पंपचालक घटलेली विक्री, बँकेच्या कर्जाचा वाढता बोजा आणि घटलेला नफा यामुळे आर्थिक आघाडीवर संघर्ष करत आहेत.
७० वर्षांत ५६ हजार, तर एका वर्षात चक्क ५५ हजारपेट्रोल आणि डिझेलच्या मागणीत वर्षाकाठी चार टक्के वाढ होते. पंपांची संख्या मात्र थेट १०० टक्क्यांनी वाढणार आहे. देशात ५६ हजार पंप सुरू करण्यासाठी ७० वर्षांचा कालावधी लागला. सध्या मात्र अवघ्या वर्षभरातच एकदम ५५ हजार नवे पंप सुरू होत आहेत. हा विक्रमी वेग आहे. तो पंपचालकांच्या अस्तित्वाला नख लावणारा ठरणारा आहे. त्यावर अवलंबून असलेल्या १० लाख कर्मचाऱ्यांच्या भवितव्याचाही प्रश्न आहे. - उदय लोध, अध्यक्ष, फामपेडा
महाराष्ट्रातील प्रस्तावित नवे पंप असे
- हिंदुस्थान पेट्रोलियम १४००
- भारत पेट्रोलियम १६६८
- इंडियन ऑइल २०७६
- एकूण ५,१४४
पंप दिवाळखोरीत निघण्याची भीती६,५०० पंप महाराष्ट्रात आहेत. पंप दुप्पट झाले तरी ग्राहक मात्र जुनेच आहेत. त्यामुळे पंपांची इंधन विक्री निम्म्यावर येणार आहे. उत्पन्नही कमी होणार आहे. याउलट खर्च मात्र तितकाच राहणार आहे.