सांगली : चार महिन्यांपासून वाढत चाललेला जीएसटी संकलनाचा आलेख नोव्हेंबर महिन्यात घटला आहे. जीएसटी संकलनात ५.६ टक्के घट झाली आहे. चालू आर्थिक वर्षात कोरोनामुळे निर्माण झालेली तूट कमी होत असली तरी, अद्याप ती १२.५१ इतकी आहे.
जिल्ह्यात जून २०२० पासून सुरू झालेला जीएसटी वाढीचा आलेख ऑक्टोबर २०२० पर्यंत सलग चार महिने कायम होता. नोव्हेंबरमध्ये तो खाली आला आहे. मागीलवर्षी नाेव्हेंबर २०१९ मध्ये जीएसटीचे संकलन ७३ काेटी ३६ लाख इतके होते. नोव्हेंबर २०२० मध्ये ६९ कोटी संकलन असून महसुलात सुमारे ४.१० कोटीची म्हणजेच ५.६ टक्के घट झाली आहे. राज्याच्या एकूण जीएसटी संकलनातही नोव्हेंबरमध्ये ६ टक्के घट दिसून येत आहे.
जिल्ह्यात एप्रिल २०२० ते नोव्हेंबर २०२० या आठ महिन्यांचा विचार करता, जीएसटीचा महसूल हा मागील वर्षापेक्षा ६८.८६ कोटीने कमी असून संकलनात १२.५१ टक्के घट आहे.
सांगली जिल्ह्यात २५१७९ करदाते आहेत. लॉकडाऊननंतर उद्योग व बाजारपेठा सुरू झाल्या असून दसरा, दिवाळीमुळे अर्थकारण गतिशील होऊन सकारात्मक हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे बाजारात उर्जितावस्था निर्माण होत आहे. उद्योगांना चांगल्या ऑर्डर मिळू लागल्यामुळे मागील महिन्यापर्यंत महसुलात वाढ होत होती. आता कमी झाली असली तरी, त्याबाबत उपाययोजना सुरू आहेत.
चौकट
चार हजार लोकांची नोंदणी रद्द
जिल्ह्यात २५ हजारपेक्षा जास्त करदाते असले तरी, विवरणपत्र भरण्याचे प्रमाण ५५ ते ६० टक्के इतकेच आहे. त्यामुळे सहापेक्षा जास्त विवरणपत्रे सादर न केलेल्या हजारो करदात्यांची नोंदणी रद्द झाल्याने व त्यांना ई वे बिल तयार करता येत नसल्याने बऱ्याच जणांनी थकीत कर व विवरणपत्रे भरली. जीएसटी विभागाने विवरणपत्र न भरलेल्या साधारण ४ हजारांवर करदात्यांची नोंदणी रद्द केली आहे.