सांगली : जिल्ह्यात १८ लाख नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस मिळाला आहे. जवळपास ५६ टक्के नागरिकांचे लसीकरण झाले असून, उर्वरित नागरिकांनाही त्वरित लस घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केले. जत तालुक्यात सर्वात कमी ४० टक्केच लसीकरण झाले असून, तेथून प्रतिसाद कमी असल्याचेही डुडी म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, १८ वर्षांवरील नागरिकांचे शंभर टक्के लसीकरण होण्याची गरज आहे. सध्या जिल्ह्यात १२ लाख ८६ हजार ५०९ नागरिकांना पहिला डोस, तर पाच लाख २५ हजार ५१३ नागरिकांनी दोन डोस घेतले आहेत. यामध्ये अन्य जिल्ह्यातील नागरिकांची संख्या नाही. जिल्ह्याचे लसीकरण ५६ टक्के झाले आहे. यामध्ये आटपाडी तालुक्यात ६० टक्के, जत ४० टक्के, कडेगाव ६१ टक्के, कवठेमहांकाळ ६० टक्के, खानापूर ५० टक्के, मिरज ५७ टक्के, पलूस ५७ टक्के, शिराळा ७३ टक्के, तासगाव ६० टक्के, वाळवा ६३ टक्के नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. जत तालुक्यातून लसीकरणास प्रतिसाद कमी मिळत आहे. म्हणूनच जत तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये जाऊन लसीकरण करण्यासाठी प्रयत्न असणार आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने नियोजन केले आहे.
चौकट
कोरोना प्रतिबंधक लसीचे आठ लाख डोस मिळणार
केरळ राज्यात कोरोनाची तिसरी लाट आली आहे. महाराष्ट्रातही मुंबई, नागपूर शहरात तिसऱ्या लाटेचा शिरकाव झाल्याचा तेथील लोकप्रतिनिधींनी जाहीर केले आहे. तिसऱ्या लाटेच्या संकटातून बचाव करण्यासाठी लसीकरण हाच चांगला पर्याय असल्यामुळे नागरिकांनी जास्तीत जास्त लसीकरण करून घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यासाठी कोरोना प्रतिबंधक आठ लाख डोस मिळणार आहेत, असेही डुडी म्हणाले.
चौकट
गर्दी टाळून गणेशोत्सव करा
केरळमध्ये ओणम उत्सवामध्ये नागरिकांची गर्दी झाली होती. यातूनच कोरोनाची तिसरी लाट निर्माण झाली आहे. सांगली जिल्ह्यातील नागरिकांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी गर्दी करू नये. गर्दी टाळून गणेशोत्सव साजरा करण्याची गरज आहे. तसेच कोरोना प्रतिबंधक सर्व नियमांचे पालन नागरिकांनी केले, तरच तिसरी लाट आपण रोखू शकतो, असे मत डुडी यांनी व्यक्त केले.