सांगली : हज यात्रेतील भाविकांना घेऊन जाण्यास टूर्स ॲन्ड ट्रॅव्हल्सचा परवाना घेण्यासाठी म्हणून तब्बल ५७ लाख १० हजार रूपये घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत समीर सलीम जमादार (वय ४८, रा. विधाता कॉलनी, विश्रामबाग) यांनी संशयित गुलाम मुर्तजा अन्सारी (रा. मुंब्रा, मुंबई) याच्याविरूद्ध विश्रामाबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित गुलाम अन्सारी याचे मुंबईत जी.एम इंटरनॅशनल, सुकून हॉटेलसमोर, जुक्रिया मशिदजवळ, पश्चिम मुंबई येथे कार्यालय आहे. सप्टेंबर २०२३ मध्ये अन्सारी आणि फिर्यादी जमादार यांनी भेट झाली. भेटीनंतर दोघांचे फोनवरून बोलणे झाले. जमादार यांचा विश्वास संपादन करून अन्सारी याने सौदी अरेबियातील हज यात्रेतील भाविकांना २०२४ मध्ये घेऊन जाणार असल्याचे सांगितले.यासाठी भारत सरकारतर्फे टूर्स ॲन्ड ट्रॅव्हल्सचा परवाना घेण्यास आर्थिक मदत लागणार असल्याचे सांगून पैसे मागितले. हा परवाना मिळाल्यानंतर ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून होणाऱ्या नफ्यातून ५० टक्के मोबदला देतो असे आमिष दाखवले. अन्सारीवर विश्वास ठेवून जमादार यांनी वेळोवेळी समक्ष आणि ऑनलाईनद्वारे जमादार यांच्याकडून ५७ लाख १० हजार रूपये घेतले.या प्रकरणानंतर जमादार यांनी अन्सारीकडे विचारणा केली. तेव्हा त्याने फसवणूक केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पोलिस ठाणे गाठून फसवणूक केल्याची फिर्याद दिली. पोलिसांनी चौकशी करून गुन्हा दाखल केला आहे. अन्सारी याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Sangli: हज यात्रेसाठी ट्रॅव्हल्स परवान्याच्या नावाखाली ५७ लाखाची फसवणूक, मुंबईतील एकाविरोधात गुन्हा दाखल
By घनशाम नवाथे | Published: May 24, 2024 4:41 PM