सांगली : वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अहोरात्र राबत असलेल्या महावितरणच्या कर्मचारी, अभियंत्यांकडून कोरोना काळातदेखील ग्राहकसेवा सुरू आहे. मार्च व एप्रिल महिन्यात जिल्ह्यात घरगुती, वाणिज्य, औद्योगिक, कृषीपंप आदींच्या पाच हजार ७०७ नवीन वीजजोडण्या कार्यान्वित केल्या आहेत.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सध्या राज्यात संचारबंदी सुरु आहे. त्यामुळे अत्यावश्यक असलेली वीजपुरवठ्याची सेवा देण्यासाठी सर्व अभियंता व कर्मचारी युद्धपातळीवर कर्तव्य बजावत आहेत. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालये, विलगीकरण कक्ष, ऑक्सिजन निर्मिती उद्योग व लसीकरण केंद्रांना नवीन वीजजोडणी किंवा वाढीव वीजभार देण्यासाठी युद्धपातळीवर केवळ चोवीस तासांमध्ये कामे करण्यात येत आहेत. यासोबतच वीजग्राहकांच्या मागणीनुसार नवीन वीजजोडण्या देण्याचे काम देखील कोविडचे नियम पाळत अविश्रांतपणे सुरु आहे. सांगली जिल्ह्यामध्ये घरगुती तीन हजार ३३०, वाणिज्य ८२१, औद्योगिक ९४, कृषिपंप एक हजार ३७४ व इतर ८८ नवीन वीज जोडण्या दोन महिन्यात दिल्या आहेत, अशी माहिती महावितरणचे अधीक्षक अभियंता धर्मराज पेठकर यांनी दिली आहे.