सांगली : जिल्ह्यात एक लाख २४ हजार ६१५ कोरोना रुग्णांच्या संख्येपैकी ५८४१ मुलांना कोरोनाची लागण झाली होती. यापैकी चौदा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला असून, उर्वरित सर्व मुलांनी कोरोनावर यशस्वी मात केली. यापैकी ८० टक्के मुले रुग्णालयात दाखल न होताच गृह विलगीकरणात बरी झाली असून, उर्वरित २० टक्के मुलांना रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, त्यांना गंभीर त्रास झालेला नाही.
मुले आणि प्रौढ या दोघांनाही कोरोनाची लक्षणे सारखी असली तरी मुलांची लक्षणे सौम्य व सर्दीसारखी असतात आणि बहुतेक मुले दोन आठवड्यांत बरी झाली आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत काही मुलांवर हा प्रभाव दिसून आला आहे. असे असले तरी कोरोनाच्या नव्या लाटेत बालकांची काळजी घेण्यासाठी त्यांची शारीरिक स्वच्छता, पौष्टिक आहार, पुरेशी झोप याकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे बालरोगतज्ज्ञांचे मत आहे. दुसऱ्या लाटेत एप्रिल २०२१ मध्ये शून्य ते १८ वयोगटातील कोरोना रुग्ण ३१५१ होते. मे महिन्यात यामध्ये २६९० रुग्णांची भर पडून संख्या ५८४१ झाली. मुलांना कोरोना होण्याचे प्रमाण वाढले आहे. वाढती संख्या लक्षात घेऊन सांगलीतील भारती रुग्णालय, मिरज शासकीय रुग्णालय आणि मिशन रुग्णालयामध्ये प्रत्येकी ३० बेडचे मुलांसाठीचे कोविड रुग्णालय सुरू केले आहे. गरजेनुसार जिल्ह्यात बेडसंख्या वाढविण्यात येणार आहे. जिल्ह्यात बाल रुग्णांवर उपचार करणारी ५१ रुग्णालये असून, तेथील डॉक्टरांची बैठक घेतली आहे, असेही जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी सांगितले.
चौकट
पालकांनी दक्षता घेतल्यास मुले सुरक्षित : मनोज जाधव
शाळा, बागबगीचे, मैदाने बंद असल्याने मुले घरीच आहेत. लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग आई-वडील, आजी-आजोबा यांच्यापासून होण्याची शक्यता आहे. पालकांनी बाहेरून आल्यावर हातपाय स्वच्छ धुऊन किंवा शक्य असल्यास अंघोळ करूनच मुलांना जवळ घेतले पाहिजे. मुले खेळायला जात असल्यास त्यांना मास्क घालून पाठवावे. बाहेरून आल्यावर त्यांनाही हातपाय धुण्याची सवय लावावी. घरी कुणी कोरोनाग्रस्त असतील तर त्यांच्यापासून लहान मुलांना दूर ठेवावे. घरात कुणाला लक्षणे असतील तर त्यांनी चाचणी करून घेण्याची गरज आहे, असे मत बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज जाधव यांनी व्यक्त केले.
कोट
जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट आल्यापासूनच बालकांच्या आरोग्याकडेही लक्ष ठेवले आहे. जानेवारी ते आजअखेर जिल्ह्यात शून्य ते १४ वयोगटच बालकांचा आहे; पण शासन आणि आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार शून्य ते १८ वयोगटातील मुलांची वेगळी नोंद आणि उपचाराची सूचना आहे. त्यानुसार त्या वयोगटातील ५८४१ मुलांना कोरोनाची लागण झाली होती. त्यापैकी चौदा वयोगटातील एकच कोरोनाबाधित मुलाचा मृत्यू झाला आहे. उर्वरितांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. यापुढेही बालकांच्या उपचाराची सर्व यंत्रणा सज्ज ठेवली आहे.
-संजय साळुंखे, जिल्हा शल्य चिकित्सक, सांगली.
चौकट
जिल्ह्यात ५१ बाल रुग्णालये
तालुका रुग्णालय संख्या
मिरज ३१
खानापूर ७
कडेगाव १
वाळवा १५
आटपाडी २
जत ६
शिराळा ४
तासगाव ६
पलूस ५
कवठेमहांकाळ ५
एकूण ५१