सांगली : समडोळी (ता.मिरज) येथे ऊसतोडीसाठी १४ मजूर पुरविण्याचे आमिष दाखवून शेतकऱ्यास पाच लाख ८६ हजार रुपयांना गंडा घालण्यात आला. दि. ५ सप्टेंबर २०२२ ते २२ नोव्हेंबर या कालावधीत हा प्रकार घडला. याप्रकरणी संदीप अशोक भिलवडे (रा. दत्त मंदिराजनजीक, समडोळी) यांनी शिवाजी मारुती शेंडगे (वय ५७) आणि बत्ताश शिवाजी शेंडगे (२५, रा. दोघेही करेवाडी, ता. जत) यांच्याविरोधात सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी संदीप भिलवडे यांना ऊसतोडीसाठी मजूर हवे होते. संशयितांनी भिलवडे यांच्याशी संपर्क साधत मजूर पुरविण्याचे आश्वासन देत ऑनलाइन बँकिंगच्या माध्यमातून आठ लाख ८६ हजार रुपये बत्ताश शेंडगे याच्या खात्यावर वर्ग करून घेतले होते. यानंतर फिर्यादी भिलवडे यांचा चालक सुरेश शिवाजी गारळे (रा. गारळेवाडी, सोन्याळ, ता. जत) यास उर्वरित राहिलेले ३९ हजार रुपये संशयितांना दिले. त्यावेळी संशयित बत्ताश शेंडगे याने सध्या आमच्याकडील मजूर पळून गेल्याने ऊसतोडीसाठी मजूर पुरविण्याबाबत असमर्थता दर्शवीत टाळाटाळ सुरू केली होती.या प्रकारानंतर भिलवडे यांच्यासह प्रमोद पाटील, शशिकांत भिलवडे, भाऊसो. भिलवडे (रा. समडोळी) आणि आसंगी तुर्कचे सरपंच श्रीमंत पाटील यांच्यासमवेत संशयित शिवाजी शेंगडे आणि बत्ताश शेंडगे यांच्या करेवाडी येथील घरी गेले; परंतु दोघेही घरी नव्हते. यावेळी शिवाजी शेंडगे यांचा दुसरा मुलगा दत्तात्रय याने भिलवडे यांना, तुमचा ऊसतोडीचा झालेला करार मला माहिती असून, सध्या मजूर मिळत नसल्याचे सांगितले.तसेच तुमचे पैसे आम्ही टप्प्याटप्प्याने देत असल्याचे सांगितले. यानंतर एकदा दोन लाख ९० हजार रुपये तर त्यानंतर १० हजार रुपये वर्ग करण्यात आले. यानंतर पैसे देण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याने अखेर भिलवडे यांनी पोलिसांत धाव घेत संशयितांविरोधात फिर्याद दाखल केली.
Sangli: ऊसतोडीला मजूर पुरवतो म्हणून शेतकऱ्याला सहा लाखांचा गंडा; पिता-पुत्रावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 1:14 PM