आटपाडी : नेलकरंजी (ता. आटपाडी) येथे दुचाकी व एसटी बसमध्ये झालेल्या अपघातात हर्ष अनिल माने या सहा महिन्यांच्या बाळाचा एसटीच्या चाकाखाली सापडून दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास नेलकरंजी बसस्थानकासमोर घडला. आटपाडी पोलिस ठाण्यात याबाबत उशिरा नोंद झाली.
याबाबात घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी: आटपाडी आगाराची आटपाडी ते सांगली बस (एमएच १० डीटी ३८६०) ही आटपाडीकडे चालली होती. नेलकरंजी बसस्थानकासमोर बस आटपाडीकडे वळण घेत होती. त्याचवेळी दुचाकीस्वार अनिल माने (वय २३, सध्या रा. म्हसवड, मूळ गाव तासगाव) हा तासगावला देवदर्शन करून पुन्हा खरसुंडीमार्गे म्हसवडकडे निघाले होते. दुचाकीवर मागे पत्नी, मुलगी व सहा महिन्यांचा हर्ष बसला होता.
वळणावर एसटी बस आणि दुचाकी यांच्यात धडक होऊन माने याच्या पत्नीच्या हातातील हर्ष खाली पडला. एसटीच्या पुढील चाकाखाली सापडून तो जागीच ठार झाला. धडकेत मृत हर्षची आई व बहीण आराध्या जखमी झाले. त्यांना पुढील उपचारासाठी भिवघाट येथे पाठवण्यात आले आहे.अनिल माने याचा भंगार गोळा करण्याचा व्यवसाय आहे.
मूळगावी देवदर्शनासाठी तो सहकुटुंब आला होता. त्याचे नातेवाईकही दुचाकीने तासगावला देवदर्शनसाठी आले होते. घरी परतताना हा दुर्दैवी अपघात झाला. अपघातानंतर नेलकरंजी बसस्थानकावर गर्दी जमली होती. सहा महिन्यांच्या कोवळ्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याबद्दल हळहळ व्यक्त होत आहे. अपघाताची माहिती मिळताच आटपाडी पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. रात्री उशिरा अपघाताची नोंद करण्यात आली.