सांगली : सांगली जिल्ह्यातील बारा साखर कारखान्यांकडे एफआरपीची ६० कोटी ८२ लाखांची थकबाकी असून, ती त्यांनी शेतकऱ्यांना अद्याप दिलेली नाही. या प्रश्नावर पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयासमोर खरडा-भाकरी आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती बळिराजा शेतकरी संघटना अध्यक्ष पंजाबराव पाटील व बी. जी. पाटील यांनी शुक्रवारी सांगलीत पत्रकार परिषदेत दिली. ते पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या कष्टावर त्यांनी खासदारकी आणि आमदारकी मिळविली. शेतकऱ्यांनीच त्यांना मोठे केले. पण त्यांच्याशीच गद्दारी करून स्वत:चे खिसे भरण्याचे या नेत्यांचे उद्योग चांगले नाहीत. त्यांच्या या भूमिकेमुळे शेतकऱ्यांची वाताहत होत आहे. एफआरपीची रक्कमही अनेक साखर कारखान्यांनी दिली नाही. तरीही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठविला जात नाही, म्हणून शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. ऊस गळिताला गेल्यापासून साखर कारखान्यांनी एफआरपीची रक्कम किमान महिन्यात दिली पाहिजे. सध्या साखर कारखान्यांचा गळीत हंगाम बंद झाला आहे. तरीही जिल्ह्यातील बारा साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम दिली नसल्याचे दिसून आले. याबद्दल साखर आयुक्त यांच्याशी संपर्क साधला असता, दि. १५ जून २०१६ पर्यंत बारा साखर कारखान्यांकडे ६० कोटी ८२ लाखांची थकबाकी असल्याचे दिसून आले आहे. शेतकऱ्यांचे सध्या खरीप हंगामातील पेरणीचे दिवस असून त्यांना मशागतीसाठी पैशाची गरज आहे. शेतकऱ्यांना कारखानदार पैसे देत नसल्यामुळे त्यांची आमच्याकडे तक्रारी केल्या आहेत. म्हणून आम्ही पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करणार आहोत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी, आमदार सदाभाऊ खोत यांना आता दिसणार नाहीत. कारण, त्यांना खासदार आणि आमदार ही पदे मिळाली आहेत. शिवाय, आता ते सत्तेत असल्यामुळे त्यांना आम्हा शेतकऱ्यांचे प्रश्न कधीच दिसणार नाहीत, असा टोलाही पाटील यांनी शेट्टी व खोत यांना लगावला. खासदार राजू शेट्टी यांनी, मला खासदार होण्यासाठी मदत करा, मी तुम्हाला आमदार होण्यासाठी मदत करतो, अशी सेटलमेंट माजी मंत्री जयंत पाटील यांच्याबरोबर केली आहे, अशी टीकाही पाटील यांनी केली. (प्रतिनिधी) वसंतदादा कारखान्यावर : जास्तच प्रेम वसंतदादा कारखान्याने २०१३-१४ वर्षातील आठ कोटी ८० लाख आणि २०१५-१६ वर्षातील १८ कोटी १४ लाख रूपये शेतकऱ्यांना दिले नाही. तरीही स्वाभिमानी शेतकरी संघटनेची त्यांच्याबरोबर जेवणावळ जोरात चालू आहे. यामुळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांना शेतकऱ्यांच्या समस्या दिसणार नाहीत. म्हणून आम्हीच शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आंदोलन करणार आहोत, असेही पाटील यांनी सांगितले.
कारखान्यांकडे ६१ कोटींची थकबाकी
By admin | Published: July 01, 2016 11:51 PM