सांगली : वसंतदादा सहकारी साखर कारखान्याने थकित ६२ कोटी रुपये गुरुवारी जिल्हा मध्यवर्ती बॅँकेत भरले. आर्थिक वर्ष संपत असल्याने जिल्हा बॅँकेने सर्वात मोठा कर्जदार असलेल्या सांगलीच्या वसंतदादा कारखान्यास नोटीस धाडली होती. अखेर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी ही थकित रक्कम भरल्याने बॅँकेच्या अडचणी दूर झाल्या आहेत. वसंतदादा कारखान्याची सध्याची एकूण थकबाकी १०२ कोटी ५४ लाख रुपये आहे. यातील ६२ कोटी रुपये कारखान्याकडून भरल्यानंतर त्यांचे कर्जाचे खाते नियमित होणार होते. कारखान्याने बुधवारी थकित रक्कम भरण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, रात्री उशिरापर्यंत याबाबत साशंकता व्यक्त होत होती. मात्र, सर्व शक्यतांना छेद देत गुरुवारी विशाल पाटील यांनी ६२ कोटी रुपये जमा केले. विशाल पाटील यांच्या या निर्णयामुळे बॅँकेची आणि कारखान्याचीही एका मोठ्या संकटातून मुक्तता झाली आहे. गेल्या पाच वर्षानंतर हे कर्ज प्रकरण नियमित झाले असून, जिल्हा सहकारी बॅँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी याबाबत समाधान व्यक्त केले. जिल्ह्यातील अनेक संस्थांनी थकित वसुलीवरून जिल्हा बॅँकेस अडचणीत आणले होते. या आर्थिक वर्षाच्या शेवटी वसंतदादा कारखान्याने थकित रक्कम भरल्याने दोन्ही संस्थांचे नुकसान टळले आहे. आटपाडीच्या माणगंगा साखर कारखान्यानेही व्याजाचे चार कोटी गुरुवारी जमा केले. यामुळे जिल्हा बॅँकेवर येऊ पाहणारे आर्थिक अरिष्ट टळले आहे. (प्रतिनिधी)
‘वसंतदादा’कडून ६२ कोटी जमा
By admin | Published: April 01, 2016 1:17 AM