सांगली : शहरातील शंभरफुटी रस्त्यावरील त्रिमूर्ती चौकात नाकाबंदीवेळी पोलिसांनी आलिशान चारचाकीतून ६३ लाख ५० हजारांची रोकड जप्त केली. याप्रकरणी कोल्हापूर येथील चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
सुहेल इनायतुल्ला पुणेकर, जावेद इब्राहिम पुणेकर, आशिष हिरालाल शुक्ला, गणेशप्रसाद गंगाप्रसाद गुर्जर (सर्व रा. कोल्हापूर) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.
याबाबत विश्रामबाग पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने शंभरफुटी रस्त्यावरील त्रिमूर्ती चौकात नाकाबंदी लावली होती. यावेळी चारचाकी वाहनांची तपासणी करण्यात येत होती. पोलिसांनी सुहेल पुणेकरसह चौघांची गाडी अडविली. वाहनाची झडती घेतली असता मागील सीटवर एका बाॅक्समध्ये ६३ लाख ५० हजारांची रोकड मिळून आली.या रकमेबाबत संशयिताकडे चौकशी केली; पण त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. विश्रामबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक कल्लाप्पा पुजारी यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. पोलिसांनी पंचासमक्ष रोकड व चारचाकी वाहन, असा ८९ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
या रकमेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक अमितकुमार पाटील व कोल्हापूर आयकर विभागाकडून करण्यात येत आहे. या कारवाईत सहायक फौजदार अनिल ऐनापुरे, हवालदार आदिनाथ माने, दरिबा बंडगर, किरण कांबळे, संदीप घस्ते, महंमद मुलाणी, ऋतुराज होळकर यांनी भाग घेतला.