सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी मतदान पार पडले. दोन दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढल्याने मतदारांचा उत्साह दुपारच्यावेळी मावळला होता. नागरिकांनी मंगळवारी सकाळी व सायंकाळीच बाहेर पडून उत्साहात मतदान केले. सांगली मतदारसंघात सरासरी ६४ टक्के मतदानाची नोंद झाल्याचा अंदाज आहे. मतदानाची अंतिम अधिकृत आकडेवारी निवडणूक विभागाने जारी केल्यावर, यात काहीअंशी बदल शक्य आहे.सांगली लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मंगळवारी, २३ एप्रिल रोजी मतदान पार पडले. सरासरी ६४ टक्के मतदान झाले असून, निवडणूक रिंगणातील १२ उमेदवारांचे भवितव्य इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये (ईव्हीएम) सीलबंद झाले. आता २३ मे रोजी मतमोजणी होणार असून, त्यामध्ये उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे.लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत सांगली लोकसभा मतदारसंघातील सांगली, मिरज, तासगाव-कवठेमहांकाळ, पलूस-कडेगाव, खानापूर-आटपाडी व जत या सहा विधानसभा मतदारसंघांतील १ हजार ८४८ मतदान केंद्रांवर २३ एप्रिल रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान घेण्यात आले. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. उन्हाची तीव्रता अधिक असल्याने, मतदारसंघातील मतदारांनी मतदान प्रक्रियेत सकाळी व सायंकाळीच सर्वाधिक प्रतिसाद दिला. मतदारसंघात सरासरी ६४ टक्के मतदान झाले असून, सांगली लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक रिंगणातील १२ उमेदवारांचे भवितव्य ‘ईव्हीएम’मध्ये सीलबंद झाले.२३ मे रोजी मिरजेतील शासकीय गोदामात मतमोजणी होणार असून, त्यामध्ये निवडणूक रिंगणातील उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. या निकालाकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.महिनाभर राहणार उमेदवार ‘सलाईन’वरमतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर बरोबर एक महिन्याने मतमोजणी होणार असल्याने निकालासाठी उमेदवारांना दीर्घ प्रतीक्षा करावी लागणार आहे. मतदान झाल्यानंतर आता निकालाविषयीच्या चर्चांना ऊत आला असून वेगवेगळे अंदाज वर्तविण्यात येत आहेत.
सांगलीत ६४ टक्के मतदान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 11:39 PM