सांगली : मिरज तालुक्यातील एरंडोली, मल्लेवाडी, सुभाषनगर, नांद्रे आणि इस्लामपूर येथील २६ जनावरे शुक्रवारी नव्याने बाधित झाले आहेत. तसेच मोराळे (ता. पलूस) येथे चार महिन्यांच्या वासराचा लम्पी आजाराने मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील आत्तापर्यंत ६५ जनावरे लम्पीने बाधित झाले आहेत.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून लम्पी त्वचारोगाचा प्रार्दुभाव आढळून येत आहे. दिवसेंदिवस लम्पीचा प्रसार वाढत चालला असल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. २६ जनावरांना लम्पीची बाधा झाली आहे. यामुळे जिल्ह्यात आत्तापर्यंत ६५ जनावरांना लम्पी त्वचारोगाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यापैकी २५ जनावरे उपचारानंतर बरी झाली आहेत, मात्र त्यांच्यावर पशुवैद्यकीय अधिकारी लक्ष ठेवून आहेत. सर्व बाधित जनावरांवर पशुसंवर्धन विभागामार्फत उपचार सुरू आहेत. त्या जनावरांची तब्येत चांगली आहे, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. एस. एस. बेडक्याळे यांनी दिली.
ते म्हणाले की, वाळवा, पलूस तालुक्यांबरोबरच शुक्रवारी मिरज तालुक्यातील एरंडोली, मल्लेवाडी, सुभाषनगर, नांद्रे आणि इस्लामपूर येथे नवीन लम्पीबाधित जनावरे आढळून आली आहेत. या जनावरांवर पशुवैद्यकीय डॉक्टर उपचार करत आहेत. मोराळे येथील चार महिन्यांच्या एका वासराचा लम्पी आजाराने मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात येथे लम्पीचा फैलाव
वाळवा तालुक्यातील इस्लामपूर १, शेखरवाडी २४, चिकुर्डे १२, इटकरे ७, किल्लेमिच्छिंद्रगड १, भडकंबे ४, पलूस तालुक्यातील सावंतपूर १, भिलवडी स्टेशन ५, मोराळे १, मिरज तालुक्यातील नांद्रे २, सुभाषनगर १, एरंडोली १, खोतवाडी १, मल्लेवाडी ४ जनावरे लम्पीबाधित आहेत.
जिल्हाधिकारी, सीईओंनी दिली खोतवाडी, नांद्रेला भेट
लम्पी चर्मरोगबाधित पशुधनास मिरज तालुक्यातील खोतवाडी, नांद्रे येथे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी व मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी त्यांनी बाधित पशुधनाची पाहणी करून ग्रामपंचायत सरपंच व इतर पदाधिकारी ग्रामविकास अधिकारी व तलाठी तसेच ग्रामस्थ यांना लम्पी चर्मरोगाबाबत करावयाच्या उपायोजना व लसीकरणाबाबत मार्गदर्शन केले.