शिराळा
: शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालयात वेळेत ऑक्सिजन पुरवठा झाल्याने ६५ रुग्णांचे प्राण वाचले. रविवरी रात्री १२ वाजता ऑक्सिजन टँकर येईपर्यंत आमदार मानसिंगराव नाईक यांच्यासह अधिकारी प्रतीक्षा करीत जागे होते.
या रुग्णालयात सहा टन क्षमतेची ऑक्सिजन टाकी आहे. येथे ७५ ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. शनिवार, रविवारी या ऑक्सिजन टाकीत अर्ध्या टनापेक्षा कमी ऑक्सिजन शिल्लक होता. टाकीमध्ये दीड टन शिल्लक असल्यापासून ऑक्सिजनची मागणी केली होती. आमदार नाईक, तहसीलदार गणेश शिंदे, गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल, डॉ. जे. के. मोमीन, डॉ. अनिरुद्ध काकडे, डॉ. प्रवीण पाटील, आदींनी ऑक्सिजन मिळावा यासाठी दोन दिवस पाठपुरावा सुरू ठेवला होता. मात्र, कधी ऑक्सिजन येणार याची खात्री नव्हती.
एक-दोन नव्हे, तर ६५ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत, त्यांचा जीव कसा वाचवायचा याचीच सर्वांना चिंता होती. आमदार नाईक, अधिकारी ऑक्सिजन मिळण्यासाठी रात्रभर जागून प्रयत्न करीत होते. अखेर रविवारी रात्री १२ च्या दरम्यान ऑक्सिजनचा टँकर रुग्णालयाच्या आवारात आला. तातडीने ऑक्सिजन टाकीमध्ये भरून घेतला.
ऑक्सिजन वेळेत आल्याने रुग्ण, त्यांचे नातेवाईक यांना दिलासा मिळाला.