संतोष भिसे सांगली : राज्यभरातील साडेसहा हजार आंतरवासिता डॉक्टरांनी सोमवारी संध्याकाळी काही मिनिटांचे मौन पाळले, शिवाय काळ्या फिती लाऊन काम केले. रुग्णसेवेत असणारे डॉक्टर्सही पाऊण तासांचा ब्रेक घेऊन यामध्ये सहभागी झाले.लातूर येथे आंतरवासिता डॉक्टर राहूल पवार यांचा कोरोनाने मृत्यू झाला. तब्बल २६ दिवस त्यांनी कोरोनाशी संघर्ष केला. त्यांच्या मृत्यूनंतरही शासनाने ५० लाखांच्या मदतीकडे दुर्लक्ष केल्याची तक्रार असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्नच्या सदस्यांनी केली. गेल्या २६ एप्रिलरोजी एमबीबीएस उत्तीर्ण झालेल्या डॉ. राहूल यांच्या मृत्यूने कुटुंब हादरले आहे.
कोरोनाशी लढताना दुर्दैवाने मृत्यू झाल्यास शासनाने वाऱ्यावर सोडू नये ही असोसिएशनची प्रमुख मागणी आहे.त्यासाठी सोमवारी व मंगळवारी संध्याकाळी पाच वाजता पाऊण तासांचा ब्रेक घेऊन मौन पाळण्यात येत आहे. राज्यातील खासगी व शासकीय महाविद्यालयांतील आंतरवासिता डॉक्टर्स यामध्ये सहभागी होत आहेत.
सांगलीत मिरजेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, भारती वैद्यकीय महाविद्यालय व इस्लामपुरातील वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर्स सहभागी झाले. मिरज वैद्यकीय महाविद्यालयात ८५ डॉक्टर्स व सांगलीत वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात ६४ डॉक्टर्सनी काही मिनिटांचा ब्रेक घेऊन मौन पाळले. काळ्या फिती लावल्या. यादरम्यान, रुग्णसेवा मात्र विस्कळीत होऊ दिली नाही. असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संकेत सोनवणे, डॉ. जय शाह, डॉ. सागर पवार, डॉ. राजेश्वर गजबरकर, मिहीर चिटणीस आदींनी नेतृत्व केले.आंतरवासिता डॉक्टरांची दुखणीशासनाकडून मृत्यूपश्चात ५० लाकांच्या मदतीची लेखी हमी नाही. कोविड आणि नॉनकोविड रुग्णांवर उपचार, लसीकरण अशा कामांचा ताण असतानाही वेतन मात्र अत्यल्प आहे. बाहेरुन येणाऱ्या डॉक्टरांना प्रवासखर्च तसेच वसतीगृहातील आंतरवासिता डॉक्टरांसाठी जेवणाचा खर्च मिळत नाही. खासगी आंतरवासिता डॉक्टरांनाही वेतन व संरक्षण नाही.