दत्ता पाटीलतासगाव : जिल्ह्यात आठवडाभर सलग ढगाळ हवामान आणि पाऊस सुरू आहे. यामुळे जिल्ह्यातील ८० हजार एकरांपैकी तब्बल ६५ हजार एकरांवरील द्राक्षबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. घडकूज, मणीगळ, दावण्या (डाऊनी) रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. फुलोऱ्यातील द्राक्षबागांना मोठा फटका बसला असून, ७० टक्के द्राक्षांचे नुकसान झाले आहे.
गतवर्षीच्या हंगामात आगाप पीक छाटणी घेतलेल्या बागांचे खराब हवामानामुळे नुकसान झाले होते. त्यामुळे या वर्षी बहुतांश शेतकऱ्यांनी आगाप छाटणी घेतली नाही. जिल्ह्यात ७९ हजार ४४० एकर क्षेत्रावर द्राक्षबाग आहे. त्यापैकी सुमारे ६५ हजार एकरांवरील बागांची छाटणी उशिरा झाली. मात्र, पुन्हा निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसला आहे.
जिल्ह्यात आठ दिवसांपासून ढगाळ हवामानासह पाऊस सुरू आहे. त्यामुळे फुलोरा अवस्थेतील, तसेच १ नोव्हेंबरपर्यंत पीक छाटणी घेतलेल्या द्राक्षबागांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. सततच्या खराब हवामानामुळे द्राक्षघडांची कुज आणि मणीगळ झाली आहे. अनेक बागांत दावण्याने थैमान घातले आहे. आतापर्यंत ६५ हजार एकरांवरील द्राक्षबागांचे ७० टक्क्यांपर्यंत नुकसान झाले आहे. उरलीसुरली बाग वाचविण्यासाठी महागड्या औषधांची दिवसरात्र फवारणी सुरू आहे. मात्र, आणखी चार दिवस ढगाळ हवामान राहणार असल्याने, बागायतदारांचा जीव टांगणीला लागला आहे.
ढगाळ हवामान आणि पावसामुळे पांढऱ्या मुळीची वाढ थांबते. पीक छाटणीनंतर फुलोरावस्थेत असणाऱ्या द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले आहे. ३५ ते ४० दिवसांच्या टप्प्यामध्ये एसएसएन, सोनाक्का, सुपर माणिक चमन या जातींच्या द्राक्षांत नुकसानीचे प्रमाण जास्त आहे. पीक छाटणीनंतर पंधरा दिवसांनी झिंक, बोरॉन, मिथाइलची फवारणी केली असल्यास, फुलोरावस्थेत नुकसान टाळता येऊ शकते. नुकसानीचा आढावा घेतला जात असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना फळ विमा योजनेचा लाभ मिळण्यासाठी कार्यवाही सुरू आहे.- मनोज वेताळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.
जिल्ह्यातील तालुकानिहाय द्राक्षक्षेत्र (हेक्टरमध्ये)
खानापूर : १,१२५
कवठेमहांकाळ : २,८७१
कडेगाव : २२९
पलूस : १,५६१
तासगाव : ९,२३६
मिरज : ८,२६८
जत : ६,९०६
वाळवा : १,२१५
आटपाडी : ३६५
एकूण : ३१,७७६